मुंबईतील न्यूज चॅनेलच्या 50 हून अधिक प्रतिनिधींना कोरोना झाल्याची बातमी वाचली. ही बातमी वाचून ऐकून तरी मुंबईतील ब्युरो ऑफिस, मुख्यालये यातील संपादक, ब्युरो चीफ आणि असाईनमेंटवाल्यांना जाग येईल अशी अपेक्षा करतोय. वास्तविक पाहाता सध्याच्या घडीला एकाही रिपोर्टरला फिल्डवर उतरवण्याची गरज नाहीये. सगळी माहिती ट्विटर, फेसबुक, युट्युब, न्यूज इजन्सी यांच्याकडून मिळते आहे. सरकारी यंत्रणाही वेळोवळी आकडेवारी देत आहेत. फक्त स्पॉटवरून लाईव्ह आणि वॉकथ्रू हवा या हट्टासाठी पत्रकारांचा जीव धोक्यात घालणे हे अत्यंत चुकीचे आहे. मी टीव्हीजेएचा प्रतिनिधी किंवा सदस्य नाही. त्यांनी खरंतर या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायला हवा आणि मुंबई, पुण्यातील फिल्ड रिपोर्टींग बंद करण्यासाठी सरकारकडून आदेश जारी करवून घ्यायला हवे होते.

काही चॅनेल ही पत्रकारांवर जबरदस्ती करतायत की वॉकथ्रू पाठवला नाही तर तुमची रजा मार्क केली जाईल. काही चॅनेल त्यांच्या रिपोर्टरना नाईट शिफ्ट करण्याची सक्ती करतायात आणि त्यांना ऑफिसच्या मेनगेटच्या बाहेरच थांबा असं सांगतायत. ते बिचारे रिपोर्टर रात्रभर गाडीत बसून डासांचा त्रास सहन करत आहेत, कारण त्यांना गाडीचा एसी लावायचा नाही असेही आदेश देण्यात आले आहेत. हे रिपोर्टर ऑफीसमध्ये आले तर इतरांना लागण होईल अशी त्यांना भीती वाटते आहे. प्रश्न हा आहे की ही भीती वाटते आहे मग त्यांना बोलावताय कशाला? त्यांना धारावी, वरळीसारख्या अतिसंवेदनशील भागात पाठवताय कशाला? समाजातील विविध समस्यांवर कंठशोष करत त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. हादरवून टाकणाऱ्या घटनांबाबत बातम्या देताना ‘काय अत्याचार झाले हो!’ असं म्हणत रडायचं बाकी ठेवणाऱ्या वाहिन्यांनी त्यांच्या पत्रकारांबाबत सहानूभूती दाखवली पाहिजे. मी चॅनेलचं रिपोर्टींग केलेलं आहे, ऑफिसमध्ये बसलेल्यांच्या मनात आलेल्या गोष्टी पूर्ण व्हायलाच हव्यात, त्यासाठी रिपोर्टर मेला तरी चालेल हा अॅटीट्यूड काही वाहिन्यांमध्ये फार पूर्वीपासून आहे. दबावामुळे आणि ताणामुळे पत्रकारांचे, कॅमेरामनचे मृत्यूही झालेले आहेत. ज्या पत्रकाराला कोरोनाचीलागण झाली असेल तो टीकटॅक, लाईव्ह करायला गेल्यानंतर निरोगी माणसालाही कोरोनाग्रस्त करून सोडू शकतो. आपले रिपोर्टर हे कोरोनाचे वाहक झालेत किंवा असू शकतात हे ओळखा, त्यांना घरातच थांबवा. ते घरून लाईव्हही करी शकतात आणि बातम्याही देऊ शकतात.

मी काही चॅनेलमधल्या मित्रांशी बोललो, त्यांनी सांगितलं ‘काय करू यार नाईलाज आहे, जावंच लागतं. नाही गेलो तर नोकरी जाईल’, ‘नकार दिला तर भविष्यात कधी झालीच तर पगारवाढ रोखण्याचीही भीती आहे’. ‘ ‘नाही’ म्हटलो तर मी त्यांच्या गटातला नसल्याने मला अजून त्रास देतील’. ‘रिपोर्टर मेला तरी कोणाला फरक पडतोय, 10-15 हजारात खूप इंटर्न्स मिळतील त्यांना’ अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. इतक्या भयंकर परिस्थितीमध्येही जर फिल्ड रिपोर्टरना अशा पद्धतीने दहशतीखाली ठेवून काम करवून घेतलं जात असेल तर मग तुम्हाला ‘इथे ओशाळली माणुसकी’ अशी ठळक ग्राफीक्स करत, चिरक्या आवाजातले व्हिओ काढत प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. थोडं जबाबदारीने वागा, कृपया रिपोर्टरकडे सहानुभूतीने वागवा. सध्याची परिस्थिती अशी आहे की शत्रूलाही मदत केली जात आहे, विरोधकालाही आपुलकीने वागवायला लागले आहेत, मग इथे तर पत्रकार आणि कॅमेरामन हे तुमचे कर्मचारी आहेत. तुम्ही भले त्यांना सहकारी मानत नसाल पण किमान कर्मचारी म्हणून तरी त्यांना घरी थांबवा.

: Shreerang Khare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *