
द्वारकानाथ संझगिरी
आज मला आठवण येतेय ती सावित्रीबाईं फुलेंची.
कारण सध्या माहोल दर्दभरा आहे. माहोल करोनाचा आहे.
१२३ वर्षापूर्वी असंच यमाचं रौद्र रूप घेऊन प्लेग आला होता. सावित्रीबाईंनी पुण्याबाहेर प्लेगचं क्लिनिक उघडलं. ध्येय एकच – जनसेवा. ती काही डॉक्टर नव्हती. पण कुणीतरी तिला कळवलं, पुण्यात महारवाड्यात कुणा गायकवाड नावाच्या इसमाचा मुलगा प्लेगने तळमळतो आहे. ती उठली आणि थेट महारवाड्यात गेली. तिने त्या मुलाला स्वत:च्या पाठीवर घालून क्लिनिकमध्ये नेलं. तिच्या या कृतीने प्लेग चिडला असावा. त्याने सावित्रीला दंश केला. ती प्लेगने गेली. जनसेवेसाठी तिने प्लेगला स्वतःची आहुती दिली.
हाफकिन हा गोरा माणूस मुंबईत येऊन प्लेगवर लस शोधत होता. ती बनवल्यावर इतर कोणावर प्रयोग करण्याआधी त्याने ती आधी स्वतःला टोचली. काय हिम्मत असेल! लस कशी तयार होते हे मी सांगायची गरज नाही.
डॉ. द्वारकानाथ कोटणीस ह्यांची कहाणी तुम्हाला ठाऊक असेलच. केवळ पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाला मान देऊन ते चीनला गेले. जपान-चीन युद्ध पेटलं होतं. चीन तेंव्हा भारताचा मित्र होता. त्या युध्दात जखमी चीनी सैनिकांवर उपचार करण्यासाठी चार भारतीय डॉक्टर्स गेले होते. त्यात एक डॉ. कोटणीस होते. ते सैनिक ना आपल्या धर्माचे, ना आपल्या देशाचे, तरी त्यांच्यासाठी कोटणीसांनी स्वत:चे प्राण पणाला लावले. ह्याला खराखुरा मानवतावाद म्हणतात. माणसाने माणसासाठी धाव घेणं. या कामात अनेक वेळा त्यांनी न झोपता बहात्तर तास सलग काम केलं. ह्या श्रमापायी वयाच्या केवळ बत्तिसाव्या वर्षी ते गेले.
यांना मी ‘दधिचीची लेकरं’ म्हणतो. देवांचा राजा इंद्र ह्याला जिंकता यावं म्हणून दधिचींनी प्राणत्याग केला आणि आपली हाडं इंद्राला वज्र बनवायला दिली. हा सर्वोच्च त्याग.
आजही अशी दधिचीची लेकरं जगभर आहेत.
आयर्लंड देशाचे अनेक डॉक्टर्स जगातल्या अनेक देशांत काम करतात. सध्या त्यातले अनेक त्यांच्या मायदेशी परतलेत. आपल्या देशातल्या रोग्यांची सेवा करण्यासाठी. त्यांचे पंतप्रधान स्वतः डॉक्टर. आपला मराठी माणूस डॉ. वराडकर. त्याने ठरवलं की आठवड्याचा एक दिवस कोरोना रोग्यांसाठी द्यायचा. हे सुरक्षित महालातून बाहेर पडून जीवाचा धोका पत्करणे आहे. ही वृत्ती सेहवागची आहे. आव्हानांचा स्वीकारं करायचा. पहिलं त्रिशतक पूर्ण करताना एकेरी धावेऐवजी षटकार ठोकायचा. पण वराडकरंचा हा षटकार मानवतेचा षटकार आहे. त्यातून जाणारा संदेश उच्च कोटीचा आहे.
इटलीत शंभर डॉक्टर्स धारातीर्थी पडले. पण तरीही क्युबातून पन्नास डॉक्टर्स तिथे लढायला गेले. हे सर्व आधुनिक दधिची आहेत.
आपल्याकडे कोवळी, नुकतीच डॉक्टर झालेली, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी पालिकेच्या हॉस्पिटल मधली साडेतीनशे लेकरं प्रत्यक्ष कोविड रोग्यांची सेवा करतायत. हीसुद्धा त्याच दधिची कुटुंबातली. त्यांना तर पर्याय नसतो. क्रिकेटमध्ये नवा खेळाडू आला की त्याला सिली पॉईंट किँवा शॉर्टलेगला उभं करतात. तिथे चेंडू लागायची शक्यता जास्त असते. तसंच ह्या शिकणाऱ्या डॉक्टरांचं आहे. हे पेशंटजवळ सिलीपॉईंटला असतात. जोखीम जीवाची असते.
माझा वर्गमित्र डॉ. सुभाष ओरस्कर हा एम डी आहे. तो आजही रोज चाळीस पेशंट तपासतो. खरं तर तो तसा धोकादायक वयातला. बरं, त्यातले बहुतेक रुग्ण हे चेस्ट इन्फेक्शनचे असतात.
मी त्याला म्हटलं ,”तू हे जे करतोहेस त्याला शुरत्व म्हणायचं की वेडेपणा? तुला दधिची व्हायचंय का?”
तो म्हणाला “कॅलक्युलेूटेड रिस्क. मी सर्व खबरदारी घेतो. अरे, आपली कोवळी मुलंमुली सिलीपॉईंटला उभे असताना आम्ही निदान सीमारेषेवर तरी फिल्डींग नको का करायला? तंबूत किँवा कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून कसं चालेल? मग या मुलांनी का जीव धोक्यात घालावा?” मी त्याला सलाम ठोकला. कारण माझ्या मुलाच्या एका मित्राचा तोंडाचा कॅन्सर जेव्हा पुन्हा उफाळून आला होता तेव्हा त्याच्या डॉक्टरने त्याला तपासायला नकार दिला होता.
ह्याची दुसरी बाजू माझा दुसरा डॉक्टर वर्गमित्र दीपक हट्टंगडी मांडतो. तो त्याच्या नर्सिंग होममध्ये पेशंट तपासतो. तो म्हणतो “अनेक डॉक्टर्सना काम करायचंय. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या अडचणी येतात. एका मित्राच्या नर्सिंग होम मध्ये दोन गंभीर अवस्थेतले रोगी आले. ते जगू शकले नाहीत. मरणानंतर ते कोरोनासाठी पॉझिटीव्ह निघाले. त्याबरोबर इतर पेशंटनी नर्सिंग होमवर केस टाकायची धमकी दिली. बरं, ज्यांची क्लिनिक्स सोसायटीत आहेत त्या बऱ्याच सोसायट्या त्यांना प्रॅक्टिस सुरू करू देत नाही आहेत. आमच्या नर्सिंग होमची नर्स घरी गेली तर तिला सोसायटीत घेतलं जात नाही. अनेक अडचणी आहेत. सांगायचं काय तर सर्वच खेळाडू तंबूत बसलेले नाहीत. त्यांनाही क्षेत्ररक्षणाला यायचं आहे.”
हे अगदी खरंय. सर्वात दांभिक आपण मध्यमवर्गीय सुखवस्तू सोसायटीत राहणारी मंडळी आहोत. अत्यंत भित्रे आणि कातडीबचाऊ. बिरबलाच्या माकडीणीच्या गोष्टीची आठवण करून देणारे. कोविडच्या रोग्यावर उपचार करणारे काही डॉक्टर्स भाड्याने ज्या सोसायटीत राहत त्यांना तिथून काढलं गेलं, ते विषाणू घरी घेऊन येतील म्हणून.
हा बेशरमपणा आहे. आपल्याला इतकी जीवाची भीती असेल तर मग त्या डॉक्टरांनी जिवाची बाजी का लावावी? मला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली. दोन डॉक्टरेट मिळूनही त्यांना कुणी घर देत नव्हत राहायला. ती सामाजिक अस्पृश्यता होती, ही मृत्यूच्या भीतीची अस्पृश्यता आहे. कुठल्याश्या फंडात पैसे फेकले, गॅलरीत उभं राहून टाळ्या वाजवल्या, पणत्या पेटवल्या, भारतमाता की जय म्हटलं की आपली सामजिक बांधिलकी संपली. प्रेक्षकांनासुध्दा एक भूमिका करता येते. ती तरी आपण करूया. ह्या डॉक्टर्स आणि नर्सेस ह्यांना दूर न ढकलण्याची.
दधिची होणं दूर, पण दधिचीला आपण भारतात जन्म घेतला ह्याचं दुःख होऊ नये एवढीतरी सामाजिक बांधिलकी आपण दाखवूया.