संजीव चांदोरकर (१३ मार्च २०२०)

अरे माझ्या मित्रा , दुर्दैवाने सार्वजनिक उपक्रमाच्या सेवा ऍमेझॉन च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून मागवता येत नाहीत रे

करोनाची लागण झालेल्या माझ्या मित्राला त्याच्या सख्या डॉक्टर भावाने बघायला देखील नकार दिलानाईलाजाने त्याला सरकारी इस्पितळात भरती व्हावे लागले; मित्र तक्रार करतोय सरकारी रुग्णालयातील सोयी यथातथाच आहेत म्हणून

मित्राच्या कारला हायवेवर अपघात झाल्यानंतर, १० लाखांची लिमिट असणारे क्रेडिट कार्ड असून देखील जवळच्या खाजगी रुग्णालयाने त्याला हात लावायला नकार दिला

नाईलाजाने मित्राला सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे लागले; मित्र तक्रार करतोय कि सरकारी रुग्णालयातील सोयी हव्यातश्या नाहीत म्हणून

अरुणाचल प्रदेशात जंगलात ट्रेकिंगला गेलेला मित्र आपल्या ग्रुपपासून अनेक तास दुरावला तेथे एकमेव नेटवर्क होते बीएसएनएलचे.

अनेक तास जीव कासावीस, ग्रुपचा, घरच्यांचा आणि मित्र बीएसएनएलच्या सेवांच्या गुणवत्तेला दोष देतोय.

अरे मित्रा तुझे वरचे तीन अनुभवच नाहीत तर अनेक जागा, वेळा, सिच्युएशन्समध्ये तू लाखो रुपये फेकायला तयार असलास तरी, खाजगी क्षेत्र तुला स्पर्श देखील करणार नाहीये.

ती वेळ अशी असेल कि सेवा घ्यायची कि नाही हा ऑप्शन तुला नसेल; झक्कत जीवनदान देणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाच्या सेवा घ्याव्याच लागतील.

तुम्ही सार्वजनिक उपक्रमाच्या सगळ्या रक्तवाहिन्या कापून टाकायच्या आणि तुम्हाला हवे त्यावेळी, त्या स्थळी, हवे त्या सिच्युएशनला त्या सार्वजनिक उपक्रमाची सेवा मात्र वर्ल्ड क्लास पाहिजे ?

ती अर्थशास्त्रावरची पुस्तके नंतर वाचलीस तरी चालेल;

फक्त बौद्धिक प्रामाणिकपणा ठेवलास तर हे तुझ्या लक्षात येईल कि सार्वजनिक उपक्रम तुमच्यासाठी, तुम्हाला पाहिजे तेव्हा “सिलेक्टेव्हली” रसरसलेले असू शकत नाहीत.

ते नेहमीच रसरसलेले असणे हे फक्त (तुमच्या भाषेत फुकट्या ) गरिबांसाठी नाही तर तुमच्या श्रीमंतांच्या जीवन मरणासाठी देखील गरजेचे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *