
शिवसेनेने प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. प्रियांका यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने सेनेच्या निष्ठावंत नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रियांका यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसनेमध्ये प्रवेश केला होता. प्रियांक यांचं इंग्रजी आणि हिंदी भाषेवर उत्तम पकड आहे. दिल्लीत त्या सेनेची बाजू नीटपणे मांडतील म्हणून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांचं युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशी उत्तम ट्युनिंग आहे.
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावर भाष्य केलं आहे. प्रियांका यांचं काम पक्षाला दिसलं आमच काम दिसलं नाही असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. मी स्मशानात जाईपर्यंत शिवसेनेत असणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद येथून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. खैरेंना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं मात्र तसं झालं नाही. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना ही उमेदवारी दिली गेली नाही. मात्र या मोठ्या नेत्यांना डावलत उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींवर विश्वास व्यक्त केला.