डॉ अजित जोशी, सीए

कोरोनाशी प्रतिकार करायला आपण विलगिकरण, एकमेकांपासून अंतर राखणे किंवा पेशंटला संपूर्णतः वेगळा ठेवणे, वगैरे मार्ग वापरत आहोत. सरकारही १८९७ चा साथीचा प्रतिकार करणारा कायदा वापरते आहे. त्यानिमित्ताने, दामोदर चापेकर यांचं तुरूंगातून लिहिलेलं आत्मवृत्त उपलब्ध असल्याचं कळलं. शोधाशोध केल्यावर ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने छापलेलं आहे आणि त्याला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोश्यांचं निवेदन आहे, असं लक्षात आलं. या आत्मवृत्तातले काही विचार आणि अनुभव…

१. काशीनाथपंत गाडगीळ यांनी आपल्या मुलीचा विवाह १६ व्या वर्षांनंतर केला. म्हणून वरातीवर दगडफेक करून वधुवारांपैकी एकाला तरी हॉस्पिटलमध्ये पाठवायची इच्छा होती. सफल झाली नाही. पण फक्त काही बायकांस दगड लागले!

२. ‘सुधारक’पत्रावर ‘डोळा’ होता. पण कृती करण्यास असमर्थ ठरल्याने ‘पापी’ आगरकर हातून सुटला. (आगरकर ९५ साली गेले!). म्हणून नंतरचे संपादक कुलकर्णी आणि पटवर्धन यांना लोखंडी काम्बिने कानशिलात आणि डोक्यावर वार केले.

३. रानडयांच्या सामाजिक सभेचा मंडप जाळायचा विचार होता. त्याकरता एक नकली सुधारणांची संस्था बनवून तिकिटं मिळवण्याचा प्रयत्न केला, तो फसला!

४. शिवाजी काही परमेश्वर नसतानाही त्याचा जयंती उत्सव टिळकांनी सुरू केला, त्याची निंदा!

५. टिळकांवर टीका (हे त्यांचंच शीर्षक आहे!)… धर्मनिष्ठ म्हणवणाऱ्यांना लांच्छनास्पद अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये वास करत होत्या! मात्र काही दिवसांनी हा पुष्कळ पटीने सुधारेल अशी आम्हाला आशा होती!

६. इंग्रजी शिक्षणामुळे विद्येच्या पाठी लागून एकंदरीत जनसमाज ‘फाजील विचारी’ झाला आणि तेणे बद्दल मर्दपणास मुकला! सबब इंग्रजी शिक्षणावर टीका…

७. एखादा युरोपियन अपराधी पाहून त्याला दंडाची शिक्षा दिल्यावर देवधर या सुधारकवादी संपादकाचे मस्तक भयंकर रीतीने कापण्याची योजना!

८. प्लेगच्या काळात इंग्रज फौज आजारी माणसाला धरून इस्पितळात रवानगी करत असे. धडक्या माणसाला कोणीही मारेल, पण हे सोजीर आजारी माणसाला धरून नेत असत, याची उपहासयुक्त शब्दात कठोर निंदा…

९. रँड मानी होता, निर्व्यसनी होता. स्त्री-लंपट नव्हता. त्याच्यावर तीन-साडेतीन महिने पाळत ठेवली तेव्हा त्याचे बरेच गुण आमच्या लक्षात आले. पण आमचा धर्मशत्रू बनल्यामुळे सूड घेणे जरुरीचे झाले.

प्लेगचा आजार आणि त्यामुळे गेलेले, जाऊ शकत असलेले बळी आणि त्यापासून वाचण्यासाठी करायची उपाययोजना याची माहिती वाचकांना असेल, अशी आशा. नसल्यास जरूर मिळवावी.

उपरोक्त अनुभव/विचार वाचून चापेकर बंधूंना काय म्हणावं आणि त्यांच्याविषयी कसा आणि किती आदर बाळगावा, हे मी वाचकाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडतो…!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *