
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. दाभोलकर यांच्या हत्यासाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल ठाण्यातील खाडीत सापडलं असून नॉर्वे येथील पाणबुड्यांच्या सह्याने हे पिस्तुल शोधण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २०१३मध्ये करण्यात आली होती. ते मॉर्निंग वॉकसाठी गेलेले असताना ओंकारेश्वर येथं दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती. दाभोलकरांना ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, ते पिस्तुल सीबीआयला सापडलं नव्हतं. सीबीआयला असा संशय होता की, हे पिस्तुल समुद्रात किंवा खाडीत फेकण्यात आलं असावं. ठाण्यातील खारेगाव खाडीजवळ आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेलं शस्त्र फेकलं होतं. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपास कामाला वेग येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.