
महाराष्ट्रात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील शाळा आणि महाविद्यालय आता बंद राहणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठ परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. महाविद्यलयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कुलगुरूंना सूचना देण्यात आल्या असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहितीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरुच राहणार आहेत. तसंच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी असा निर्णय सरकारने घेतला आहे.