
अभिजित देशपांडे
दोघेही कोवळ्या वयाचे. धर्मांध भडकाऊ विचारांनी माथेफिरू बनून अंदाधुंद गोळीबार करणारे. तथाकथित देशभक्तीने प्रेरित होऊन आपण जणू धर्मकृत्यच करीत आहोत असा पुरेपूर विश्वास त्यांच्याठायी इतका ओतप्रोत की वेळप्रसंगी शहीद होण्याचीही तयारी. अडकतील किंवा मरतील तर ही पोरं. त्यांचे राजकीय देव मात्र नामानिराळेच राहणार. मोकळेच राहणार. पुन्हापुन्हा हेच करीत राहणार.
किती साम्य आहे दोघांमध्ये?
बघता बघता भारताचा पाकिस्तान करून ठेवला यांनी. धर्म फक्त वेगळा. त्यामागची हिंसक वृत्ती मात्र तीच. धर्मांध. माथेफिरू. देशभक्तीचा महान मुलामा असलेली.आणि हे सगळं घडतं गांधीजींच्या स्मृतिदिनी. तरूणांची शांततापूर्ण निदर्शनं चालू असतांना.
भारतीय म्हणून लाज वाटण्याची, हतबल होण्याची केविलवाणी वेळ येऊ नये म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने हे बदलण्यासाठी संविधानाच्या मार्गाने सकारात्मक कृती करण्याची गरज आहे. त्यासाठी रस्त्यावरच यायला हवे, असेही नाही. (आणि वेळ पडलीच तर तेही यायलाच हवे.. अगदी आपापले सुरक्षित कोश भेदून बाहेर यायला हवं..) आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने शांतता सौहार्द सहभाव ही मूल्ये रूजवण्याचे परोपरीने प्रयत्न केले पाहिजेत. अर्थातच स्वत: पासून, घरापासून समाजबांधणीची सुरूवात होते.
नाहीतर उद्या तुमच्या आमच्यातलाच कुणी कोवळा पोर असा अंदाधुंद झालेला असेल. आणि आपण सुन्न होऊन फक्त निषेध करीत राहू. किंवा तेही करता येणार नाही, अशा स्थितीत असू.