
श्रीरंजन आवटे
काही मुलं एका मुलीचा पाठलाग करू लागतात तेव्हा ती एका अनोळखी घरात शिरते. त्या घरातला पुरुष विचारतो, मीही एक पुरुष आहे पण तरीही तू माझ्या घरात येण्याचा कसा काय विचार केलास?
त्यावर ती मुलगी उत्तरते,खिडकीतून मी पाहिलं तुमच्या घरात शिवरायांचा फोटो होता. ज्याच्या घरात शिवरायांचा फोटो ती व्यक्ती स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहूच शकत नाही! (मी अत्यन्त सपक भाषेत हा प्रसंग सांगितल्याबद्दल मला माफ करा.)
अशा प्रकारचा एक प्रसंग अनेक व्याख्याते सांगत असतात. हा प्रसंग खरा किंवा खोटा, किती अतिरंजित हा मुद्दा वेगळा.फोटो आहे म्हणून त्यांच्या विचारांनुसार व्यक्तीचं आचरण आहे असं मानणं हेही विशेषच.
पण घरादारात,ऑफिसात छत्रपती शिवरायांचा फोटो लावणाऱ्या आपणा सर्वांनी काही महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवून वागायला हवं असं वाटतं.
उदा. खालील तीन मुद्दे:
● धर्मनिरपेक्ष राजा:
शिवराय धर्मनिरपेक्ष राजा होते. धर्मावरून त्यांनी लढा दिला नाही. सर्व धर्मांना समान वागणूक मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता.
● समतेचे पुरस्कर्ते:
अठरापगड जातीधर्माचे मावळे शिवरायांच्या सोबत होते. स्त्रियांना सन्मानाची हमी देणारे छत्रपती शिवराय समतेच्या मूल्यांचा पुरस्कार करत होते.
● लोककल्याणकारी भूमिका:
‘रयतेचे राजे’ असा शब्दप्रयोग करताच शिवरायांचं नाव समोर येतं. शिवरायांनी ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये’ या प्रकारची भूमिका घेतली. राज्यकर्त्यांनी हीच भूमिका घ्यावी आणि त्यांच्या भूमिकेची आठवण नागरिकांनी त्यांना करून द्यायला हवी.
‘जय भवानी जय शिवाजी’,’जय शिवराय’ आदी घोषणा देताना या अत्यन्त मूलभूत मुद्द्यांचा आपण विसर पडू देता कामा नये. अन्यथा फोटो राहतील आणि आपण केवळ भक्त बनू. शिवरायांची वेगवेगळी रूपं आपण आठवू, प्रतापही मनात साठवू पण मूल्य प्रत्यक्षात उतरवू.