
शिवजयंतीचं निमित्त साधत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘शिवत्रयी’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहेत. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांना सोपावण्यात आली आहे. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित,” असं म्हणत नागराजने चित्रपटाच्या घोषणेचा ३० सेंकदांचा टीझर पोस्ट केला आहे.
एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित…आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹 pic.twitter.com/r4GaizGCeE— nagraj manjule (@Nagrajmanjule) February 19, 2020
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.