ज्या स्त्रिया स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्यांनी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाचं पूजन करायला हवं, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विक्रम गोखले यांनी हिंदू मॅरेज कोड वरही भाष्य केलं आहे. अभिनेते विक्रम गोखले म्हणतात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज कोड’चा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. तसंच धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम डॉ. आंबेडकरांच्या ऋणात राहिले पाहिजे.’ असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्‍‍मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. स्वत:ला स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी, सावरकरभक्त म्हणणे सोपं आहे. पण असं म्हणणाऱ्यांनी सावरकरांच्या विचारांवर देखील प्रेम केलं पाहिजे. सावरकर आणि आंबेडकर हे नेते एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा तिरस्कार केला नाही. त्यामुळे संपूर्ण खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील, असंही विक्रम गोखले म्हणाले.

दरम्यान, हिंदू समाज कधीही एकत्र येत नाही, हा आपला इतिहास आहे. त्यामुळेच 1400 वर्षे आपण गुलामगिरीत जगलो. हिंदुंनो देशावर खरं प्रेम असेल तर किंवा पुढच्या पिढीवर उपकार म्हणून तरी सर्व भेद विसरून एकत्र या, असं आवाहनही गोखले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *