
हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला आहे. पीडिता तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज देत होती. आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मूळ गावात तणाव निर्माण झाला आहे. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला आहे. गावामध्ये अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडत असल्याचे दिसत आहे. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला आहे.
आज सकाळी 7.40 मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांकडून तिला वाचविण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले जात होते. मात्र आज सकाळी तिच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते त्यातच तिचा मृत्यू झाला आहे.
तरुणीच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तरुणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच त्यांनी पीडितेला न्याय मिळावा यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावी अशी मागणी केली आहे.
हिंगणघाटमधील बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही. महाराष्ट्राच्या मातीसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. खरंतर आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच त्या बहिणीला खरी श्रद्धांजली ठरेल,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.