या विकृतीला प्रेम म्हटल्याने, प्रेमाची बदनामी होते, पुरूष नकार पचवू शकत नाही म्हणून तो हिंसक झाला ही गोष्ट सेकंडरी बनते आणि पुरूषाने केलेल्या हल्ल्याला एक सटल स्वीकारार्हता मिळते. हल्ल्याचं कारण म्हणून एकतर्फी आलं की मग त्या बाईच्या कॅरेक्टरबद्दल पण दबक्या आवाजात चर्चा सुरू होते. त्यामुळे माध्यमांनी भाषा बदलली पाहिजे. एकतर्फी प्रेमातून हल्ला, हे सतत बातम्यांमध्ये असं ठसवलं जातं जणू हल्ल्याचं एकप्रकारे समर्थन आहे.एकतर्फी किंवा दुतर्फा प्रेमात असलेली कुठलीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करू शकत नाही.

नकार पचवू न शकलेल्या पुरूषाचा महिलेवरचा हल्ला आहे हा. त्याला प्रेमाचं कोंदण देणं बंद करूया.
दुसरी गोष्ट त्या बाईने अमकी ढमकी काळजी घ्यायला हवी होती, म्हणजे ती वाचली असती असल्या चर्चा तातडीने थांबल्या पाहिजेत. बाईवर हल्ला झाल्यावर बाईला अक्कल शिकवू नका. बाई, तिच कुटुंब सेफ्टी प्रिवेंटिव केअर मध्ये कमी पडलं असं नॅरेटिव सेट होतं त्यातून. याउलट त्या पुरूषाला या कटात कुणी कुणी सहकार्य केलं असेल? त्याच्या या खुनशी मानसिकतेचे पुरावे त्याच्या आधीच्या वागणूकीमध्ये कुठे उमटले होते, याचा शोध घ्या, त्या बाईचं चारित्र्य शोधायच्या फंदात पडणं चूकीचं आहे.

त्या महिलेच्या कुटुंबाला प्रचंड आर्थिक, मानसिक, वैद्यकीय, कायदेशीर मदतीची गरज अनेक वर्ष पडणार आहे. ती मदत द्या किंवा त्यासाठी प्रयत्न करा. आता वाचली तर तिचं लग्न कसं होणार? असले टुक्कार प्रश्न विचारून पिडितेच्या नातलगांना छळू नका.मुली शिकल्या, घराबाहेर पडल्या की त्या कुणाच्या प्रेमात पडू शकतात, त्यांच्या प्रेमात कुणी पडू शकतं म्हणून शिक्षण थांबवून त्यांची लग्न लावून दिलेलीच बरी, असल्या चर्चांना तर काहीच अर्थ नाही. मुली स्वत:च्या पसंतीचा नवरा करतील, जोडीदार शोधतील मग आपला कंट्रोल जाईल तिच्या आयुष्यावरचा या असुरक्षिततेून तिला कोंडून ठेवणारे, मारहाण करणारे सुशिक्षित पालक मी पाहिले आहेत. त्यांची कीव येते. आपल्या आक्षेपार्ह वागण्याचं ते ‘काळजी वाटते’ या नावाखाली जे समर्थन करतात ते हास्यास्पद आणि संतापजनक असतं. वर एवढी वर्ष आम्ही अमक टमकं केलं म्हणून आम्ही निवडतो त्याच जोडीदाराशी लग्न व्हावं हेही टुमणं थांबलं पाहिजे.

जगायचं आधुनिक टेक्नाॅलाॅजीच्या मदतीने आणि जुनाट कालबाह्य विचारांना कवटाळून बसायचं ही विसंगती पावलोपावली आहे.अशा घटनांचा आणखी एक परिणाम म्हणजे, बाईला – मुलीला सार्वजनिक, राजकीय, सामाजिक आयुष्यातून withdraw होण्याचे सल्ले दिले जातात. बघ, असं काहीतरी होईल त्यापेक्षा नकोच पडूस त्यात. कुणी चूकीचं वागत असेल तरी आवाज उठवू नकोस. तुझ्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे हे सांगणं फार कळकळीने काळजीने आपल्यावर प्रेम करणाऱ्यांकडून एेकू येतं. केईएम मधली अरूणा शानबागची कहाणी काय वेगळी होती? चोरीविरोधात जाब विचारला म्हणून बलात्कार आणि भीषणप्रकारे झालेल्या हल्ल्याने ती उर्वरित आयुष्य कोमात जगली.

क्रूर हिंसक विकृतीच्या बळी ठरतील म्हणून महिलांनी सार्वजनिक जीवनात यायचं नाही असा उपाय काढला तर महिलांच्या समान हक्काच्या लढाईच्या आंदोलनाची पीछेहाट होईल. त्या पर्यायाची चर्चा, उपाय म्हणून होताच नये. बाईचा सार्वजनिक जीवनातील टक्का वाढावा म्हणून जेवढे दीर्घकाल प्रयत्न झाले त्यापेक्षा फारच कमी वेळात तिला घरीच बस -सेफ बाई, हे सुचवलं जातं. कसल्याच भानगडीत न पडणं हे सुरक्षित मानलं जातं ते चुकीचं आहे. ही सुरक्षितता बेगडी आहे.त्यामध्ये घरगुती हिंसा जणू घडतचं नाही हा ढोंगीपणाही आहे.

बाईच्या जातीने बोलू नये, आवाज उठवू नये, सगळ्ळं सहन करावं, पुरूषाला आवडतं तसं जगावं, आपल्या मनाला मारून घराच्या प्रतिष्ठेसाठी कुठल्याही दिल्या घरी सुखी रहावं, कायदेशीर प्राॅपर्टीचे हक्क सोडून द्यावेत म्हणजे कुठे ती बाई समाजाच्या व्हॅलिडेशनच्या पात्रतेची बनते. असल्या भपंक व्हॅलिडेशनला न मानता खमकेपणाने बाईने उभं रहावं. सावित्रीची आम्ही लेकरं आहोत. हे पाठीचा कणा ताठ करून अभिमानाने पुन्हा पुन्हा सांगावं.पुरूषसत्तेला आमचा कडाडून विरोध आहे. माणुसकीला पाठिंबा आहे आणि बायकांच्या समान हक्कासाठी बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, लढणाऱ्या बायका पुरूषद्वेष्ट्या नसतात, समानतेच्या पाईक असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *