सांगली :निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यू-ट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतो. त्यांचा नुकताच अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या कीर्तन सोहळ्याचा संपूर्ण व्हिडीओ त्यांनी 4 जानेवारी 2020 ला यू-ट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. या कीर्तनामध्ये त्यांनी पुत्र प्राप्त होण्यासाठीचा संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान केले आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी ‘टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब’ अशी अशास्त्रीय, बेजबाबदार, स्त्री दाक्षिण्य भंग करणारी आणि कायदा व संविधानविरोधी वक्तव्ये आपल्या कीर्तनातून केली आहेत. अशी बेकायदेशीर विधाने करून इंदुरीकर महाराजांनी थेट पीसीपीएनडीटी कायद्याचेच उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांवर त्वरीत गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केली.

अविनाश पाटील पुढे बोलताना असे म्हणाले की, “पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. छापील पत्रक, संवाद अगर एसएमस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22(3), कलम 22 चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा आहे.” शासनाने या कायद्यानुसार इंदुरीकर महाराजांच्या अशास्त्रीय वक्तव्याची त्वरीत दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा. समाजात अज्ञानावर आधारीत चुकीच्या गोष्टी, अंधश्रद्धा पसरवू नयेत, प्रचार प्रसार करु नये, असे स्पष्ट जादूटोणा विरोधी कायद्यात म्हटले आहे. महाराजानी जादूटोणा विरोधी कायद्याचाही भंग केलेला आहे. अशी अशास्त्रीय वक्तव्ये फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आणि वारकरी चळवळ स्वीकारणार नाहीत. याचीही नोंद महाराजांनी घ्यावी.

अन्य कोणत्याही राज्याला नाही एवढी पुरोगामी संत व समाजसुधारकांची परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आहे. वारकरी संप्रदायाचे कीर्तन हे तर समाज प्रबोधनाचे मोठे साधन आहे. मात्र इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य हे अशास्त्रीय आहे. लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. ‘मुलगाच व्हावा तरच स्वर्गात जागा’ ही अंधश्रद्धा यामागे आहे. त्याला महाराज खतपाणी घालत आहेत, असे आमचे मत आहे.

स्त्री ही चेष्टा, मस्करी, विनोदाचा भाग असू नये, तिचा आत्मसन्मान राखला पाहिजे. पण वेळोवेळी इंदुरीकर महाराज किर्तनातून स्त्रीयांची अवेलहनाच करत असतात. त्यांच्या किर्तनातून ते नेहमीच स्त्रियांचा द्वेष करत असतात व भेदभाव करत असतात. त्यांचे हे वर्तन संत तुकाराम महाराजांच्या ‘भेदाभेद भ्रम, अमंगळ’ या अभंगाशी विसंगत आहे. संत जनाबाई म्हणतात, ‘स्त्री जन्म म्हणूनि न व्हावे उदास। साधु संता ऐसे केले जनी॥’

महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका खालील मुद्द्यांतून स्पष्ट केली.

1) इंदुरीकर महाराजाना वारकरी धर्म कळलेला नाही. कारण वारकरी धर्मात लहान थोर, स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही. समानतेची ‘माऊली’ म्हणून आदराने उल्लेख करायची परंपरा आहे. किर्तन हे समाजात प्रबोधन व जागृती करण्यासाठी असते. महाराज चुकीची, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा पसरवणार्‍या गोष्टी सांगतात.

2) इंदुरीकर महाराज हे विज्ञानाचे पदवीधर असूनही त्यांना विज्ञान कळले नाही. मूल कसे होते याचे शरीर विज्ञान आहे. मुलगा किंवा मुलगी कशी होते ती एक्स-एक्स किंवा एक्स-वाय गुणसुत्राची जोडी ठरविते, हे मुलांना शाळेत शिकविले जाते, हे महाराजांना माहीत नाही, त्याबाबतही अज्ञान ते प्रगट करतात.

3) इंदुरीकर महाराजांना संविधानही कळले नाही. जात, धर्म, वंश, प्रांत, लिंगानुसार समाजात भेदभाव करता येत नाही. त्यांनी तो लिंग भेदभाव केला आहे. सर्व भारतीय नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसार, प्रचार अंगीकार करायचे कर्तव्य संविधानाने सांगितले ते महाराजाने केलेले नाही.

4) महाराज गुरूचरित्र, धर्माचा यासाठी आधार घेतात, हेही चुकीचे आहे. त्यावेळच्या कालसापेक्ष मर्यादा, विज्ञान यावर आधारीत असू शकते. ते आजच्या विज्ञानावर तपासले पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी असतील तर त्यात कालसुसंगत बदल केले पाहिजेत. संत धर्मसुधारकांनी हेच केले आहे.

5) इंदुरीकर महाराजांना आमचा जाहीर प्रश्न त्यांनी जुळी मुले कशी होतात? याचा दिवस, तारीख सम की विषम ही सांगावी. जुळ्या मुलांत काही वेळा मुलगा मुलगी होऊ शकते हे का होते? याचेही स्पष्टीकरण त्यांनी देणे गरजेचे आहे.

संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगतातून अंधश्रद्धेवर प्रहार केले. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनीही समाजातील अनिष्ट, अघोरी प्रथा-परांपरांविरोधात काम केले आहे. सध्या अनेक किर्तनकार आपल्या किर्तनातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत आहे, हे अभिनंदनीय आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील संत-समाजसुधारकांचा पुरोगामी वारसा पुढे चालविण्याचे काम करते. त्यामुळे आम्ही महाराजांच्या या अशास्त्रीय वक्तव्यांचा धिक्कार करतो आणि त्यांच्यावर शासनाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *