विशाल हिवाळे
( संविधानाचे अभ्यासक व प्रचारक)

मा.उद्धवजी ठाकरेंना,पंतप्रधान मोदीजी 1 तास वेळ देतात, हि देण फक्त राष्ट्रवादी+कॉग्रेस +पुरोगाम्यांची आहे.यापूर्वी मोदिजी भेट न देता फक्त फोनवर बोलायचे हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये.लोकसभा निवडणूकी दरम्यान दिलेलं वचन विधानसभा निवडणूकीत पाळलं नाही म्हणूनच उद्धवजींनी 25 वर्षाची युती तोडली.भाजप नावाचा अजगर आपल्याला गिळतोय हे त्यांच्या लक्षात आल्या बरोबर, शरद पवारसाहेब, कॉग्रेस आणि पुरोगाम्यांनी शिकारीची भूमिका पार पाडून, त्या अजगरा पासुन सेना वाचवली. अजित पवारांनी एका रात्रीत गेम फिरवला, F20 सोबत शपथ घेतली त्यावेळी उद्धवजी गर्भगळीत झालेले पूर्ण देशाने पाहिलंय. शरद पवारसाहेब धैर्याने या घटनेला सामोरे गेले, सेनेसहित सर्व लोकशाही, धर्मनिरपेक्षवादी आमदारांची बहुमत सिद्ध करणारी बैठक त्यांनी लावली. त्या बैठकीत आपण दोन चिरंजिवांचा आधार घेत आलेलात हे सुद्धा सर्वांनी पाहिलंय. त्यावेळी तुमच्या पायात त्राण राहिलं नव्हतं. अर्धमेले झालेला. मात्र पवारसाहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी+कॉग्रेस + पुरोगामी आमदार तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहुन तुमच्यात जीव आणला.

पुढच्या घडामोडींचा तपशिल मांडत नाही पण आपण मुख्यमंत्रीही झालात. तेव्हा अलिकडचा ताजा इतिहास विसरू नका. भाजपने तुमचा वापर करून स्वतः ला बळकट केलंय त्या प्रकारे तुम्ही राष्ट्रवादी- काँग्रेस- पुरोगाम्यांचा शिडीसारखा उपयोग करून घेण्याच्या फंदात पडू नका. शिडी तुटून कधीही कोसळले जाल. भाजपने तुमचे अतोनात हाल केलेले, अनेक जख्मा करून सोडलेलं. मोदिजी केवळ फुंकर घालत आहेत. फुंकरच्या झुळकेने सुखावून हुरळून जाण्यात उदयाच मरण आहे. हे लक्षात घेऊन पाऊल उचला.

एका भेटीतच आपण NRC,CAA,NPR चं समर्थन करू लागलात. आंदोलकांना भडकवलं जातंय, त्यांनी कायदा समजून घेतला पाहिजे. हि आजची आपली भूमिका, कालच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे मोदीजींना भेटण्यापूर्वी आपण कायदा समजून न घेताच भूमिका मांडत होतात असा याचा अर्थ होतो. बरं बाहेर हा कायदा समजविण्याची जबाबदारी मा.अमित शहांवर आहे.त्यांनी अनेकदा हा कायदा समजवून सांगितला असेल पण उद्धवजींना तो समजला नसावा.

मात्र , मोदिजींनी घेतलेल्या गुप्त बैठकवजा बौद्धिक तासात मुख्यमंत्र्यांना NRC,CAA,NPR चं आकलन लागलीच झालं. बरं उद्धवजी म्हणतात, NRC फक्त आसाम पुरताच आहे. हे मान्य केलं तरी डिटेंशन कँपचा प्रश्न शिल्लक राहतो.NRC केवळ आसाम पुरता आहे तर देशात विविध ठिकाणी डिटेंशन कँप बांधायची गरज काय? आसाम मधले अनेक लोक, आसाम मध्येच डिटेंशन कँप मध्ये अॉलरेडी टाकलेत. मग वाढीव डिटेंशन कँप कशाला हवेत? उद्धवजी म्हणतात,” CAA हा शेजारील देशातील अल्पसंख्यकांना नागरिकत्व देण्याकरिता आहे. बरं हेही मान्य करूयात. तिकडच्या मुस्लिमांना आपल्या देशात नागरिकत्व दयायचं नाही. फक्त अल्पसंख्य इतर धर्मियांना दयायचं.हे मान्य केलं तरी, मग या देशातल्या नागरिकांना, नागरिकत्व सिद्ध करायची गरज काय? म्हणजे नव्याने येणाऱ्यांना नागरिकत्व दयायचं पण जे या देशात अनेक पिढया राहतात त्यांनी नागरिकत्वाचा पुरावा दयायचा ? किती विरोधाभास? किती कायदयातलं गौडबंगाल?उद्धवजी तुम्हीच आता यावर प्रकाश टाकून, महाराष्ट्रातील जनतेला विश्वास दया.

NPR हा शिरगणतिचा भाग आहे, हे तुमचं मत कोण नाकारेल. पण पूर्वी झालेल्या शिरगणतीत आणि आता होणाऱ्या शिरगणतीत तुम्हाला काहीच फरक आढळला नाही का? एक तर तुम्ही NPR कायदयाचा अभ्यास नीट केलेला नसावा. किंवा पंतप्रधान मोदीजींना तुम्हाला गुंडाळलं असावं. असो, एका तासाच्या बैठकीत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरें मध्ये झालेला बदल हा आमूलाग्र झाला की केला गेला. हे लवकरच कळेल.तो पर्यत संविधानवादी जनता कुणावरही विश्वास न ठेवता याच्या खोलात जात राहिल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *