
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बुलेट ट्रेनवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय तातडीने गरजेचं आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या, पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते सुद्धा पोसायचे, हे काही योग्य नाही, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला विरोध केला आहे.
बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे. त्याच्यामुळे इथं किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचं ते. हे ड्रीम प्रोजेक्ट जरी असलं तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते… स्वप्न नसतं.