
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटच्या नावावरुन वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणतात, अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला हा शब्द आपण उघडपणे उच्चारत नाही. मात्र या चित्रपटाच्या नावातच अश्लील हा शब्द आहे. थोडक्यात, या नावावरुन चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असं प्रेक्षकांना भासविण्यात येत आहे. या चित्रपटाच्या नावामुळे लोकांची लैंगिक भूक चाळावली जाते. आणि त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत आहे.
काही दिवसापूर्वी पुण्यातल्या अनेक रस्त्यावर ‘सविताभाभी तू इथंच थांब!!’ या आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरची संपूर्ण शहरभरात जोरदार चर्चा सुरू झाली होती.
अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटातील ‘सविता भाभी’ या पात्रावरून वाद सुरू झाला होता. सविता भाभी हे एका कॉमिकमधलं काल्पनीक पात्र आहे. त्यामुळं या पात्राच्या कॉमिक कॉपीराइटवरून सिनेमाच्या निर्मात्यांना निलेश गुप्ता यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. सविता भाभी या काल्पनीक पात्राचे कॉपीराइट आपल्याकडं असल्याचं निलेश गुप्ता यांनी म्हटलं आहे. कॉपीराइट्स माझ्याकडं असतानादेखील सिनेमाच्या निर्मात्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही,असंही गुप्ता यांनी म्हटलं आहे.
अभिनेता आलोक राजवाडे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’या चित्रपटाच दिग्दर्शन करत आहे. सई ताम्हणकर सविता भाभीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात पर्ण पेठे, अभय महाजन, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतूराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ यांनी ही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत.