शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना उदयनराजे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. या पुस्तकावर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेनं नावातून शिव काढून टाकावं, मग समजेलं किती तरूण तुमच्या पाठीमागं उभे राहतात,’ असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाजी महाराज राहू दे, आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार तरी अमलात आणा असा टोला उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो, असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन या पुस्तकावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल असं कुणी नाही. त्यामुळे आज काल कुणालाही ‘जाणता राजा’ची उपमा दिली जाते. याचा मी जाहिर निषेध करतो असं म्हणतं, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. मी महाराजांचा वंशज म्हणून कधीही नावाचा दुरुपयोग केला नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. उदयनराजे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून देशभरामध्ये वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेऊन या पुस्तकावरील भाजपची भूमिका स्पष्ट केली. लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *