हे आवाहन केलं आहे Tanmay Kanitkar यांनी. तमाम हिंदुत्ववाद्यांनी याला #सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी विनंती.

‘हिंदूराष्ट्र व्हावे’ असं म्हणणाऱ्यांनी एकत्र यावे. या संघटनांनी आपापले प्रतिनिधी नेमून एक घटना समिती बनवावी. आणि त्यात बसून एकदाची काय ते हिंदूराष्ट्राची नेमकी कल्पना मांडावी. हिंदू राष्ट्र म्हणजे काय हे सांगणारं एक समांतर संविधान बनवा. कळू तरी देत हिंदूराष्ट्र म्हणजे नेमकं काय हवंय? त्यातले कायदे कसे असणार आहेत? त्यातली लोकशाही कशी असणार आहे? सरकार निवड कशी असणार आहे? त्यातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं असणार आहे? त्यातलं लैंगिक स्वातंत्र्य, आहार स्वातंत्र्य कसं असणार आहे? अंधश्रद्धा विषयी कायदे काय असणार आहेत? इतर धर्म मानणाऱ्यांना किंवा कोणताही धर्म न मानणाऱ्यांना स्थान काय असणार आहे? जातनिर्मुलनासाठी काय विचार आहे? आदिवासी समाज, त्यांच्या संस्कृती, प्रथा यांच्याविषयी काय म्हणणं आहे? भाषाविचार काय आहे या हिंदूराष्ट्राचा? निदान लोकासंमोर स्पष्ट कल्पना असेल की एखादी व्यक्ती हिंदूराष्ट्र म्हणते तेव्हा काय अभिप्रेत आहे.

हिंदूराष्ट्राचा उठता बसता उद्घोष करणाऱ्या संघटना- मंडळींनी असा काही सहमतीने सविस्तर दस्तऐवज बनवला आहे काय? असल्यास द्यावा. म्हणजे मग ते संविधान आणि दोन अडीच वर्षं खपून, प्रचंड चर्चा करून जे आपलं सध्याचं संविधान बनवलं गेलंय ते, यांची थेट तुलना करून बघता येईल. आपल्याला काय हवंय याचा निर्णय घेता येईल ना, निदान स्वतःपुरता.

तुमची Idea of India काय आहे? मांडा तरी एकदा लोकांसमोर. नाहीतर होतं काय, हे लोक कधी मुस्लीमविरोधाचं बोलतात, कधी कॉंग्रेसच्या चुकांबद्दल बोलतात, कधी राष्ट्रप्रेमाविषयी बोलतात, कधी डाव्यांना शिव्या घालतात. कधी डावे कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट अमेरिकन एकत्र येत कसं हिंदूविरोधी कारस्थान रचतायत याच्या कहाण्या सांगतात.

यांच्यातला कोणी एक उठून काहीतरी मत व्यक्त करतो, दुसरा उठतो आणि या पहिल्याला मनातून कधीच माफ नाही करणार म्हणतो. तिसरा उठतो आणि अमुक कायदा देशभर लागू करणार म्हणतो पण चौथा येतो आणि म्हणतो असं काही आम्ही कधी म्हणलंच नाही! परस्परविरोधी बोलत राहतात मंडळी. आणि आपण येडे लोक हीच वक्तव्य वेचून एकमेकांवर फेकायला वापरतो. तर सरळ यांना विचारायला हवं ना, की बाबांनो तुमची नेमकी कल्पना आम्हाला सांगा तपशिलांसह.कुजबूज, भाषणबाजी, अफवा, थापा यापलीकडे जात बुद्धीचा वापर करत, विचारविनिमय करत सर्व प्रमुख हिंदूराष्ट्र वाल्या संघटनांनी एकदा एक संविधान बनवावंच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *