शिवसेनेचे नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार हे शिवसेनेवर काही दिवसांपासून नाराज होते. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं.

विधानसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा होती. मात्र त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. खातवाटपापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे औरंगाबादला पोहोचले असून त्यांनी सत्तार यांची मनधरणी सुरू केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार अब्दुल सत्तार राज्यमंत्रिपदाच्या राजीनामावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही पहिली बातमी आहे. अशा अनेक बातम्या आता येतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *