एनआरसी आणि सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) विरोधात जमात-ए-इस्लामी हिंदने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. जमात-ए-इस्लामी हिंद, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.  या कार्यक्रमात संजय राऊत एनआरसी आणि सीएएच्या विरोधात नेमकं काय भाष्य करतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमात संजय राऊत यांच्यासह माजी न्यायाधीश बीजी कोळसे पाटील, ज्येष्ठ वकील युसूफ मुछावाला यांचा देखील सहभाग आहे. मुंबई महापालिकेजवळील पत्रकार भवनात शनिवारी संध्याकाळी हा कार्यक्रम होणार आहे.

संजय राऊत यांनी आम्ही दिलेलं निमंत्रण स्वीकारलं आहे. ते या कार्यक्रमाला उपस्थितही राहणार आहेत, असं जमात ए इस्लामी हिंदकडून सांगण्यात आलं. विशेष म्हणजे, लोकसभेत शिवसेनेने सीएए कायद्यावरून भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र राज्यसभेत शिवसेनेनं या कायद्याला विरोध केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करायचा की नाही यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्पष्ट करणार असं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *