सुनिल तांबे

२० जानेवारी १९९० रोजी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि स्वतंत्र काश्मीर राष्ट्राचा पुरस्कार करणार्‍या दहशतवादी गट, संघटनांनी काश्मीरी पंंडितांना काश्मीर खोर्‍यातून चालते व्हा असा इशारा दिला.
अनेक काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या. पुनून काश्मीर या संघटनेच्या म्हणण्यानुसार साडेतीनशे काश्मीरी पंडितांना या काळात कंठस्नान घालण्यात आलं.

जम्मूमध्ये निर्वासितांच्या छावण्या उभ्या करण्यात आल्या. त्यानंतर दिल्लीमध्ये. दरडोई, दरदिवशी रु. १२५ वाटण्यात आले. आपली घरंदारं सोडून आलेल्या पंडितांना तंबूंमध्ये राहावं लागलं. पाणी, रेशन सर्वाचीच कमतरता होती.

सुस्मृत प्रद्युम्न कौल हा माझा मित्र काश्मीरी. गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन, त्यानंतरचं आणीबाणी विरोधी आंदोलन यामध्ये सहभागी असणारा. समाजवादी विचारांचा. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या धोरणांना विरोध करणारा, नर्मदा बचाव आंदोलन, एन्‍रॉन विरोधी आंदोलन यामध्ये कृतीशील सहभाग असणारा. पुनुन काश्मीर या काश्मीरी पंडितांच्या संघटनेबद्दल त्याला ममत्व होतं. काश्मीर खोर्‍यातील विशिष्ट प्रदेश काश्मीरी पंडितांसाठी आरक्षित करावा अशी मागणी या संघटनेने केली होती.

मी माझ्या गावी गेलो त्यावेळी दहशतवाद्यांनी घराला वेढा घातला, मी सरकारसाठी हेरगिरी करतोय म्हणून मला ताब्यात द्यावं अशी त्यांची मागणी होती, प्रद्युम्नने मला सांगितल्याचं स्मरतं.
कोणत्याही समूहावरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधातील लढ्याबद्दल प्रद्युम्नला सहानुभूती होती. समाजवादी, गांधीवादी वा कम्युनिस्ट काश्मिरी पंडितांवरील अन्यायाबाबत मूग गिळून बसतात याची त्याला चीड होती.

काश्मीरी पंडित आणि डोग्रा जमीनदार होते. शेख अब्दुल्ला यांनी कसेल त्याची शेती हा कायदा करून त्यांच्या जमिनी कोणतीही नुकसान भरपाई न देता ताब्यात घेतल्या आणि भूमिहीनांना त्या जमीनीचं वाटप करण्यात आलं. काश्मीरी पंडित सुशिक्षित होते. केंद्र आणि राज्य सरकारात मोक्याच्या पदांवर होते. मात्र तरिही त्यांची काश्मीरात ससेहोलपट झाली. त्यांची घर ताब्यात घेण्यात आली. घरातील सामानसुमान लुटण्यात आलं. सरकार, लष्कर, पोलीस त्यांचं संरक्षण करू शकले नाहीत. आजही हजारो काश्मीरी पंडित निर्वासितांच्या छावण्यात राहात आहेत. काश्मीरमधील त्यांची घरं व मालमत्ता त्यांच्या ताब्यात नाही. त्यांना काश्मीरमध्ये परतता येईल अशी परिस्थिती आजही नाही.

भारत विचित्र देश आहे. हिंदूराष्ट्रवादाच्या नावाखाली ब्राह्मणवाद थैमान घालतो आहे अशी टीका केली जात असताना, काश्मीरी पंडित अर्थात ब्राह्मण त्यांच्याच देशात निर्वासितांचं जिणं जगत आहेत. जेव्हा गावातला, वस्तीतला बंधुभाव नष्ट होतो (कुठल्याही कारणांमुळे) त्यावेळी सरकार, लष्कर, पोलीस हतबल होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *