ब्रम्हा चट्टे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे पुस्तक “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” यावरून जो काही वादंग माजला आहे. त्यावर मला खरं तर लिहायचं नव्हतं किंवा काही भाष्य करायचं नव्हतं. कारण प्रतीकात्मक राजकारणावर काही लिहायचं नाही असेच ठरवले आहे. मात्र छत्रपती शिवरायांचा विषय असल्यामुळे काही गोष्टी मांडाव्या लागतील.

देशासमोर मूलभूत प्रश्न आ वासून उभे असताना प्रतीकात्मक प्रश्न समोर आणून लोकांची दिशाभूल करणं सोपं असतं. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगले उमगला आहे त्यामुळे या अस्त्राचा ते वारंवार वापर करतात.

आर्थिक मंदीचा फटका आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. या मंदीमुळे 2019-20 या आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा तब्बल 16 लाख कमी रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे उघड झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात याची माहिती आली आहे. देशाचा वार्षिक आर्थिक विकासदर वारंवार घटत आहे. त्यामुळे सरकारी रोजगार संधी नाही तर उद्योगांमध्ये रोजगार नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक उद्योग बंद पडत आहेत तर अनेक बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काहीनी दिवाळखोरी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

रोजगार निर्मितीसाठी परदेशी गुंतवणुकी यायला तयार नाही. परदेशी उद्योग गुंतवणूक देशातून काढून घेत आहेत. सरकारी धोरणांमुळे शेतीची अवस्था काय झाल्यावर जास्त सांगायला लागू नये. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तर कुपोषणाने दरवर्षी देशात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या आठ लाखाहून अधिक बालकांचा मृत्यू कोणत्या ना कोणत्या कारणाने होत आहेत. सध्या देशात चार कोटी बालके कुपोषित आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार पाच वर्ष कमी वयातील मुलांचा दर मिनिटाला 1 मृत्यू होत असल्याच नमूद आहे. राजस्थानमध्ये नुकतेच 104 बालकांनी आपले प्राण गमवले, तर उत्तर प्रदेशात बालमृत्यूचा अड्डा झाला आहे. अशा अनेक समस्या देशासमोर आ वासून उभ्या असताना भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र प्रतीकात्मक राजकारणामध्ये गुंतून पडले आहेत. विरोधक त्या राजकारणात फसत आहेत.

आज के शिवाजी या पुस्तकाच्या लेखकाचा उद्देश तसाच काहीसा आहे. वादग्रस्त पुस्तकाचे लिखाण करणारे लेखक जयभगवान गोयल हे स्वतःचं नाव जयभगवान असल्यामुळे कदाचित आपूनच भगवान हे या थाटात छत्रपती शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींशी करून बसले. या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालं तरी भारतीय जनता पक्ष म्हणतो की याचा आमच्याशी काही संबंध नाही. जनमताचा रेटा वाढल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुढे येत हे पुस्तक मागे घेतात, तर लेखक माफी मागतो आणि अशा सगळ्या गोंधळात महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते पवारांना जाणता राजा कसे म्हणता हा प्रश्न विचारून एका नव्या वादाला तोंड फोडतात.

मुळात हे मी शरद पवार यांच्या प्रेमापोटी लिहीत नाही पण एक महत्त्वाचा मुद्दा लोकांच्या लक्षात आणून देणे गरजेचे वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे गुण होते त्या गुणांच्या जोरावर शिवरायांनी तात्कालिक परिस्थितीमध्ये जे कार्य केले आहे ते खूपच महान आहे. त्यामुळेच छत्रपती शिवरायांना एकमेव्दितीय आहेत.

शिवाजीमहाराजांना अनेक उपाद्या दिल्या जातात. त्या मिळून एक शिवाजी महाराज आहेत. त्यातली एक उपाधी एकाला लावली तर शिवाजी महाराज होत नाहीत. एखाद्याचं महिलां विषयी असलेले धोरण शिवरायांसारखा असेल तर त्याला शिवरायांसारखा महिलांचे धोरण असे म्हणता येईल. एखाद्याच कर्तुत्व शिवरायांच्या संरक्षण विषयक धोरणा सारखं कार्य असेल तर त्याला शिवरायांच्या संरक्षण धोरणाची उपमा देता येईल.

शरद पवार यांना देशासमोरच्या सर्व प्रश्न जाणीव आहे. त्यामुळेच त्यांना जाणता राजा ही उपाधी दिली जाते. मोदींनीही पवार यांचे बोट हातात घेऊन राजकारण करत असल्याच स्पष्ट केले आहे.

शरद पवारांना जाणता राजा ही उपाधी दिली जाते ती शिवरायांच्या अनेक उपाद्या पैकी एक उपाधी आहे, तर पुस्तकाच्या लेखकाने आज के शिवाजी असं म्हणत मोदींनी थेट शिवाजी महाराजांच ठरवून टाकले आहे हा मूलभूत फरक भाजपवाल्यानी लक्षात घ्यायला हवा. एक उपाधी आणि थेट शिवाजीराजांसारखा दुसरा शिवाजी या संबोधनामध्ये भरपूर फरक आहे, इतक जरी भाजपाला समजून आलं तरी खूप झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *