डॉ. जितेंद्र आव्हाड

तत्कालिन सामाजिक व्यवस्थेमध्ये शूद्रांना-अतिशूद्रांना, स्त्रियांना म्हणजेच आजचे मागासवर्गीय,आदिवासी,इतर मागासवर्गीय,भटके विमुक्त यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्रच नाही, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले.मुख्य धारेची वृत्तपत्रे आपल्याला जागाच देत नाहीत, ती एका विशिष्ट जातीची मक्तेदारी आहेत असे त्यांचे मत झाले.अखेरीस छत्रपती शाहू महाराजांनी या ‘दबलेल्या आवाजा’ला “वाचा फोडा” असे सांगत २५०० रुपयांची मदत केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना जाती व्यवस्थेने ‘मूक’ करून टाकले होते ,त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एक वृत्तपत्र काढले. त्याचे नाव ‘मूकनायक’!

त्याला आज 31 जानेवारी 2020 रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.केंद्र सरकारचा नागरिकत्व कायदा येतो आहे. ज्या जाती व्यवस्थेने समाजातील वंचित, शोषित, पीडित वर्गाला देवळात, स्मशानात, पाणवठ्याजवळ येऊ दिले नाही, तो सनातनी वर्ग आजही तितकाच मजबूत आहे.

व्यवस्था वरकरणी बदलल्यासारखी दिसते आहे पण नागरिकत्व कायद्यामुळे ज्यांची आज पहिली पिढी पाच हजार वर्षानंतर शिक्षण घेऊन सुशिक्षित दिसते आहे त्यांनी आपला इतिहास काय सांगायचा ? कुठून आणायची कागदपत्रे ? त्यामध्ये ढोर, चांभार, महार, मातंग, आदिवासी, भिल्ल, रामोशी, बेरड, पारधी, वडार, बंजारा, लमाण, कुडमुडे-जोशी, गोसावी, कैकाडी, डोंबारी अशा अनेक जाती-जमाती आहेत ज्यांच्याकडे अशा पुराव्यासाठी कागदाचे चिटोरे देखील सापडणार नाही.

या समाजामधील बहुतांशी लोकांकडे आजही जमिनीचे पट्टे नाहीत, घरांचे दाखले नाहीत, वास्तव्याचे दाखले नाहीत, किंबहुना गावामध्ये राहायला जागाच नाही. ‘पारध्याला आपण गावात येऊ देतो’ असे सांगणारे एकही गाव महाराष्ट्रात असेल असे मला वाटत नाही.

सद्य परिस्थितीत हा नागरिकत्व कायदा वरकरणी जरी मुसलमान विरोधी वाटत असला तरी
त्याचे दुष्परिणाम सा-या उपेक्षित, वंचित समाजाला भोगावे लागतील ही बाब दडवून ह्या कायद्याने फक्त मुस्लिमांना धडा शिकवला जातो आहे असा भ्रम तयार करण्यात सनातनी मक्तेदार असा ‘विशिष्ट वर्ग’ यशस्वी झाला आहे.

ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायका’च्या स्थापनेनंतर त्याच ‘मूकनायका’च्या माध्यमातून मनुस्मृती ‘जाळली’, त्या मनुस्मृतीची कारस्थानपूर्वक पुर्ननिर्मिती होते आहे असे माझे ठाम मत आहे.परत एकदा ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढले आणि ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र काढले त्या वंचित, शोषित, पीडित समाजाला परत सामाजिक लढाईत उतरावे लागेल.म्हणूनच मी म्हणतो… आजही ‘मूकनायका’ची आणि ‘भीमा’ची समाजव्यवस्थेला गरज आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *