
आपली अर्थव्यवस्था आजारी आहे, पण सरकार मान्य करत नाही. अर्थव्यवस्थेला नायटा झाला व खाजवायची चोरी झाली. पुन्हा खाजवाल तर गुन्हेगार किंवा देशद्रोही ठरवले जाल अशा शब्दात शिवसेनेनं मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंता केली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं की, पंतप्रधान कार्यालयाच्या एकाधिकारशाहीमुळं अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. राजन यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं देशाच्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
रघुराम हे अर्थव्यवस्थेचे निष्णात डॉक्टर आहेत व त्यांनी केलेली नाडीपरीक्षा योग्य आहे. अर्थात देशाच्या अर्थव्यवस्थेला लकवा मारला हे स्पष्ट दिसत आहे. विद्यमान सरकार तज्ञांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही व देशाची अर्थव्यवस्था म्हणजे त्यांच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’ झाला आहे, असं म्हणतं शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.
या लेखात अर्थमंत्री यांच्या मी कांदा खात नाही या विधानाचा ही समाचार घेण्यात आला. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, पण अर्थकारणात त्यांचे योगदान काय? मी कांदा खात नाही, तुम्ही खाऊ हे त्यांचे ज्ञान. पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कांदा ही जीवनावश्यक वस्तू असून तो इतका महाग झाला आहे की, कांदा ‘लॉकर्स’मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे, असं मोदी यांनी म्हटलं होतं. आज त्यांची भूमिका बदलली आहे. मोदी हे आता पंतप्रधान आहेत व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्यास पंडित नेहरूंना व इंदिरा गांधींना जबाबदार धरता येणार नाही असं ही या अग्रलेखात म्हटलं आहे.