डॉ. जितेंद्र आव्हाड

महंमद अली जीना आज हयात असते तर त्यांनी आनंदाने आपल्या आवडत्या स्कॉचचा आणखी एक पेग भरला असता. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी १९४७ साली देशाची फाळणी घडवून आणली, तेव्हा मुस्लिमांसाठी पाकिस्तान आणि हिंदूंसाठी भारत असा त्यांचा हिशेब होता. पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल अशा काही राज्यांमधले मुस्लिम नव्याने निर्माण झालेल्या तत्कालीन पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानात गेले सुद्धा. पण जीनांच्या नाकावर टिच्चून करोडो मुस्लिम भारतालाच आपलं ‘वतन’ मानून इथेच राहिले.

जीनांचा हिशेब चुकला. कारण भारताने जात, पात, भाषा, धर्म, वंश यावरून कुठलाही भेदभाव न करणारी निधर्मी व्यवस्था स्वीकारली. जिथे आपल्या पिढ्यानपिढ्या गेल्या, ज्या मातीत आपण जन्माला आलो, तिला सोडून पाकिस्तानसारख्या अपरिचित भूमीला आपला देश मानायला हा मुस्लिम समाज तयार झाला नाही. तो भारतीयच राहिला. त्यातूनच पुढे महंमद रफी, बिसमिल्ला खान, कैफी आझमी, शकील बदायुनी, झाकिर हुसेन, झफर इक्बाल, महंमद अझरुद्दीन, सलीम दुराणी, सैय्यद किरमाणी, महंमद शमी, मधुबाला, मीनाकुमारी, सानिया मिर्झा, जनरल आफसीर करीम, जनरल सैद हस्न, अझीम प्रेमजी आणि डॉ. अब्दुल कलाम .परमवीरचक्र अब्दुल हमीद अशी असंख्य रत्नं जन्माला आली, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात भारताचं नाव जगभरात उज्ज्वल केलं.

विविधतेतील एकता म्हणजे काय हे भारताने जगाला शिकवलं. अठरापगड जातींचा, धर्मांचा हा देश १९४७ नंतर वीस वर्षे सुद्धा टिकणार नाही, असं म्हणणाऱ्यांच्या (चरचिल) तोंडावर चपराक मारून तो आजही टिकून आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणून, मुस्लिमांना अचानक परके ठरवून, मोदी – शहा यांना नेमकं काय साधायचं आहे हेच कळत नाही. कारगिल युद्धात शौर्य गाजवलेला लष्करी अधिकारी किंवा दिवंगत राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचे वंशज नागरिकांच्या यादीतून वगळले जातात याचा काय अर्थ लावायचा? समाजमन निष्कारण दुभंगलं की देशाचे तुकडे पडायला वेळ लागत नाही, ही साधी गोष्ट या खुर्चीवर बसलेल्या जोडगोळीला कळत नाही?

या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर त्यांना देश पुन्हा एकदा तोडायचा आहे असाच अर्थ होतो. आपलं अधुरं स्वप्नं मोदी – शहा आज पूर्ण करताना पाहून जीनांचा आत्मा आज खुष झाला असेल.

निधर्मी घटना लिहिणारे आंबेडकर यांना अनुकरणीय नाहीत, तर मुस्लिमांना देशाचे शत्रू मानणारे गोळवलकर हेच त्यांना वंदनीय आहेत. संघाच्या आहारी जाऊन या विधेयकाचं समर्थन करणाऱ्या बहुजनांना आज लक्षात आणून देतो की घरचा देव्हाऱ्यात मनुस्मृतीला फुलं वाहणारे हे लोक आहेत. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ते कुठल्याही थराला जातील. मुस्लिम समाजाचं खच्चीकरण ही पहिली पायरी आहे. उद्या तुमचा नंबर असेल.

जमलेच तर हिटलर नि पारित केलेला neumberg law 1935 डोळ्या खालून घाला.
त्याने हा कायदा करताना ज्यु ना सुरक्षितेची हमी दिली होती जी आज नागरिकत्वाच्या कायद्या नंतर मोदी शाह मुसलमानांना देत आहे
पण इतिहास काय सांगतो?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *