@आनंद शितोळे

नागरिकत्व विधेयकाच्या निमित्ताने भारतातली गंगाजमनी तहजीब नाकारून देशाच सरसकटीकरण करू पाहणाऱ्या भंपक आक्रस्ताळी लोकांसाठी, इतिहासाची मढी उकरून त्यावर मतांच्या पोळ्या भाजायला गेलात तर फक्त तुमच्या मतलबाचे आणि सोयीचे सांगाडे बाहेर पडणार नाहीत.

खिलजीच्या सैन्याला फितूर होऊन देवगिरीचा अभेद्य किल्ला शत्रूच्या हातात अल्लाद देणारा आणि देवगिरीच साम्राज्य पराभूत व्हायला कोण कारणीभूत होत ? हेमाद्री पंडित ? सांगा कसा पुसणार इतिहास ?

राणा प्रतापाचा सेनापती होता हकीमखान सुरी नावाचा पश्तून पठाण आणि अकबराचा सेनापती होता राजा मानसिंग.अकबर जिंकला तर मानसिंग पण जिंकतो आणि राणा प्रताप जिंकला तर हकीमखान पण जिंकतो.सांगा कसा पुसणार इतिहास ?

इथिओपियाचा हबशी गुलाम स्वकर्तृत्वावर उच्चपदाला पोहोचला त्या मलिक अंबरने खापरी नळाने खडकीला पाणी पुरवठा योजना केली, अहमदनगर शहराला पाणीपुरवठा योजना केली.याच मलिकने जमीन मोजणी आणि महसूल आकारणीची यंत्रणा उभारली.कसा पुसणार इतिहास ?

अहमदनगरजवळचा शाह शरीफ दर्गा माहितेय का ? मालोजीराजे भोसलेंनी नवस बोलला आणि झालेल्या दोन मुलांची नाव ठेवली शहाजी आणि शरीफजी , याच दर्ग्याला आजही दिवाबत्ती भोसले कुटुंब करत ? कसा पुसणार इतिहास ?

शहाजी राजांना “ फर्जंद “ म्हणजे राजपुत्र किताब देणारा आदिलशहा, सरस्वतीची प्रार्थना करणारा आदिलशहा, शिवाजी महाराजांना भाऊ म्हणून मैत्री जपणारा गोवळकोंडा किल्ल्याचा कुतुबशहा , सांगा कसा पुसणार इतिहास ?

शहाजी राजांना अटक करणारा मुधोळकर बाजी घोरपडे ? पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून गाव बेचिराख करून वेशीत पहार खुपसून त्यावर चप्पल बांधणारा मुरार जगदेव ? शिवाजी राजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव करणारा मिर्झा राजे ? सांगा कसा पुसणार इतिहास ?
शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर आणि अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ? सांगा कसा पुसणार इतिहास ?

शृंगेरी च्या मठाला लुटून नुकसान करणार मराठी सैन्य आणि त्या मठाला दुरुस्ती करायला निधी देणारा टिपू सुलतान ? सांगा कसा पुसणार इतिहास ?

पानिपतावर झालेल्या तीन लढाया , तिन्ही लढायांमध्ये स्थानिक आणि परकीय असा संघर्ष झाला. शेवटच्या लढाईत मराठी सैन्याच्या बाजूने होता इब्राहीमखान गारदी, सांगा कसा पुसणार इतिहास ?

सरहद्द गांधी किताब अभिमानाने छातीवर बाळगणारा ,शेवटपर्यंत फाळणीला विरोध करणारा म्हातारा खान अब्दुल गफार खान ? ब्रिटीश सत्तेशी झुंज घेणारा अशफाकउल्लाखान आणि कुर्बान हुसेन ? गांधींचा जीव वाचवणारा बतकमिया अन्सारी ? आझाद हिंद फौजेचा शाहनवाज खान ? मौलाना आझाद ? अब्दुल हमीद ? सांगा कसा पुसणार इतिहास ?कारगिल युद्धात शौर्य गाजवणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याला आसामात आपण भारताचे नागरिक आहोत हे कागदावर सिद्ध करण्यात अपयश येत याचीही दखल घेणार का ?

इतिहासाची मढी उकरताना आपल्या सोयीचे सापळे कधीही निघत नाहीत हेच त्रिवार सत्य. कापड विणल जात उभ्या आडव्या धाग्यांनी , एकाच आडव्या धाग्यांनी किंवा एकाच उभ्या धाग्यांनी नाही. भारताची गंगाजमनी तहजीब हि या उभ्या आडव्या धाग्यांनी घट्ट विणलेले महावस्त्र आहे.त्याच्या चिंध्या करायला निघालेले गणंग हे खरे देशाचे शत्रू.

#आयडियाऑफइंडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *