दिवाकर शेजवळ 
divakarshejwal1@gmail.com

1990 च्या प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभ्या केलेल्या हिंदुत्वाच्या लाटेपासून फटकून न राहणे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय समयसूचकता होती. त्यातून त्यांनी शिवसेना प्रवाहपतीत होण्याचा धोका तर टाळलाच. उलट आक्रमक भूमिका घेत शिवसेनेला त्या लाटेच्या शिर्षस्थानीही त्यांनी आणले होते. अन या राजकारणातही ‘मला देवळात जाऊन घंटा बडवणारा हिंदू नकोय!’ अशी प्रबोधनकारांशी नाते सांगणारी शिकवणही बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना कायम देत राहिले. विशेष म्हणजे, न्यायालयात गीतेच्या जागी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावावर हात ठेवून शपथ घ्यावी, अशी मागणी वारंवार करत आलेले शिवसेनाप्रमुख हे देशातील एकमेव नेते होते.

राजकारणात येताना आणि युती, आघाडी करताना कोणीही स्वतःचा धर्म बुडवून येत नसतो. त्याची गरजही नसते. जम्मू काश्मीरमध्ये भाजप हा पिडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी आघाडी करून सत्ता मिळवतो, तेव्हा हिंदुत्व सोडले काय, हा सवाल भाजपला कोणी विचारत नाही. पण एकट्या शिवसेनेने नवी काही राजकीय भूमिका घेतली की, विरोधकांना आणि विशेषतः मीडियाला हिंदुत्वाचे काय होणार याची चिंता छळू लागते हे नवलच म्हणावे लागेल.

मागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या भेटीत शिवशक्ती – भीमशक्तीच्या एकजुटीचा नारा देत शिवसेना – रिपाइं एकत्र आले होते. त्या राजकीय प्रयोगासाठी आठवले हे काही ‘बुद्धत्व’ सोडून देऊन’ मातोश्री येथे गेले नव्हते. पण तरीही ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले काय?’ अशी ओरड त्यावेळी सुद्धा झालीच होती. आंबेडकरवादी नेते जेव्हा राजकारणात डाव्या, कम्युनिस्ट पक्षांसोबत जातात, तेव्हा मात्र ‘मार्क्सचे रक्तरंजित क्रांतीचे तत्वज्ञान स्वीकारले काय, असा सवाल त्यांना कोणीच विचारताना दिसत नाही.

मग हिंदुत्वाच्या भवितव्याची चिंता वा त्याच्या त्यागाची भीती फक्त शिवसेनेच्या नव्या, वेगळ्या भूमिकेनंतरच मिडियासह अनेकांना नेहमी का छळू लागते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *