■ दिवाकर शेजवळ ■
divakarshejwal1@gmail.com

विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ पत्रकार कपिल पाटील यांच्या ‘आज दिनांक’ सायंदैनिकात मी मुख्य उपसंपादक असतानाची ही गोष्ट 1995 च्या विधानसभा निवडणुकीआधीची बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीरामजी हे हयात होते आणि त्यांना विद्यमान बसपा अध्यक्षा मायावती यांच्या तुलनेत किती तरी पटीने अधिक रस महाराष्ट्रात होता.

कांशीरामजी यांची राज्यात सभा असो, चैत्यभूमीवरील महापरिनिर्वाण दिन असो की निवडणुका असोत, अवघे वातावरण बसपामय झाल्याचे चित्र उभे करण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्या काळात कांशीरामजी यांच्या अनेक जाहीर सभांचे मी वार्तांकन करतानाच त्यांच्या मुलाखतीही घेतली होती. एकदा त्यांच्या भिवंडी येथील सभेतून मला ‘आज दिनांक’ साठी मिळालेली हेडलाईन होती. ‘भुजबळांच्या समता परिषदेत फूट’
तर, बसपाच्या अशा वातावरण निर्मितीमुळे निवडणूक काळात तो पक्ष राजकीय चर्चांमध्ये केंद्रबिंदू बनवायचा. युती – आघाडीबाबतची गणिते, आडाखे, राजकीय विश्लेषणे यात बसपाला दखलपात्र मानले जायचे. त्यातून 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसला बसपाशी युती करणे भाग पडेल, अशी जोरदार चर्चा होती. त्यावेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते दादासाहेब रुपवते यांचे पक्षातील स्थान मोठे होते. काँग्रेस- बसपा युतीच्या संभाव्य युतीबाबत सर्वत्र सुरू झालेल्या चर्चेबद्दल मी दादासाहेबांना छेडले होते. त्यावर त्यांनी उसळून दिलेल्या उत्तरातून मला खळबळजनक बातमी मिळून गेली होती.

‘आज दिनांक’ मधील त्या बातमीचा मथळा होता:
काँग्रेस मूर्खांचा पक्ष आहे काय?: रुपवते

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सरकार स्थापन होऊ न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सरकार स्थापन करण्याबाबतचा गोंधळ आणि संभ्रम मिटेनासा झाला आहे. या परिस्थितीत दादासाहेब रुपवते यांनी काँग्रेसबद्दल बोलताना केलेला ‘तो’ सवाल हटकून आठवला आहे. आजच्या परिस्थितीत तोच सवाल काँग्रेसला विचारण्यासाठी अनेकांच्या ओठी येत असेल. कारण या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांमध्ये लढण्याच्या जोशाचा पूर्ण अभाव होता. तरीही राज्यातील जनतेनेच काँग्रेसला ‘हात’ दिला असून त्या पक्षाला बऱ्याच अंशी शरद पवार यांनीच राष्ट्रवादीसोबत तारून नेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *