
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल दाखल झालं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्या लढाऊ विमानाची पूजा केली. मात्र या पूजेवरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मात्र या वादावर राजनाथ यांनी मौन सोडलं आहे. ”मला जे योग्य वाटलं ते मी केलं. या गोष्टींवर माझा लहानपणापासून विश्वास आहे. ज्याला जे बोलायचं आहे त्यांनी ते बोलावं”, असं राजनाथ यांनी म्हटलं आहे.
भारतात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल दाखल झालं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाच्या पंखावर ‘ओम’ काढला. तसंच, विमानाच्या चाकाखाली लिंबू फोडलं. ‘राफेल’ पूजनाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या पूजेमुळे अनेकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.