@दिवाकर शेजवळ

मागील गणेशोत्सवाच्या काळात टीव्ही कलावंत भाऊ कदम यांना टार्गेट करण्यात आलं होतं. यंदाच्या गणेशोत्सवात ‘पोपट’ फेम गायक आनंद शिंदे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. दोघांच्या बाबतीत निमित्त वा कारणे वेगवेगळी असली तरी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी निवडण्यात आलेली ‘वेळ’ एकच आहे. म्हणून गणेशोत्सवाचा उल्लेख मुद्दाम करावा लागला आहे.

रेशमी गळ्याचे वरदान लाभलेले गायक दिवंगत प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांनी समर्थपणे चालवला आहे. पण त्यांचे नातू,
आंनदरावांचे उच्चशिक्षित सुपुत्र डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी तर आपल्या घराण्याच्या गायकीच्या वारशाला अल्पावधीतच ‘शिंदेशाही’ हे नामाभिधान प्राप्त करून देऊन शिखरावर पोहोचवलं आहे.

कलेच्या प्रांतात चमकदार कामगिरीमुळे यशाचे शिखर गाठलेल्या नामवंतांना अफाट लोकप्रियता आणि ग्लॅमर लाभत असते. त्याचा फायदा घेण्याकडे राजकीय पक्षांचा कल असतो. त्यातून प्रख्यात कलावंताना उमेदवारी देवून निवडून आणण्याचा वा त्यांची वर्णी राजयसभा, विधान परिषदेवर लावण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात. त्यानुसार, अनेक अभिनेते, अभिनेत्री, क्रीडापटू, साहित्यिक यांचा संसदीय राजकारणात सहभाग दिसतो. त्यात गैर असे काहीच नसते. उलट, निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंत असामींना वरिष्ठ सभागृहात राष्ट्रपती, राज्यपालांमार्फत नियुक्त करण्याची तरतूद आपल्याकडे आहे.

त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी आनंद शिंदे तर विधान परिषदेसाठी उत्कर्ष शिंदे यांची नावे चर्चेत आली आहेत. त्यांना शिवसेनेने ऑफर दिल्याच्या बातम्या आधी आल्या. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसहसुद्धा त्यांना गळ घालत असल्याच्या बातम्या कानी येत आहेत. अर्थात, राजकारणात पदार्पण करायचे काय आणि कोणत्या पक्षाची ऑफर स्वीकारायची यावर निर्णय घेण्याचा प्रश्न सर्वस्वी आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे यांचा आहे. तसेच त्यावर निर्णय घेण्याचाही त्यांना पूर्ण अधिकार आहे.

शिंदे पिता- पुत्र यांच्या निर्णयावर आणि राजकीय भूमिकेवर मते मांडायचे , भाष्य करण्याचे स्वातंत्र्य आंबेडकरी समाजातील त्यांच्या चाहत्यांसहित सर्वांना आहेच. तसेच आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन राजकारण यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार  शिंदे पिता- पुत्रांनाही आहेच. हे विचारांचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्यघटनेतून देशाच्या प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. ते कोणीही कोणापासून हिरावून घेऊ शकत नाही.

असे असतानाही आनंद शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांना रिपब्लिकन नेतृत्वावर टीका केल्याबद्दल आणि ते शिवसेनेची ऑफर स्वीकारतील, असे गृहीत धरून सोशल मीडियावर सध्या टार्गेट केले जात आहे. त्यांच्या विरोधात शिवराळ भाषा वापरत रान उठवले जात आहे. शिंदे यांना आजवर केलेल्या कार्यक्रमांसाठी देण्यात आलेल्या ‘बिदागी’ बद्दल ‘सुपारीबाज’ अशा शब्दात त्यांची संभावना केली जात आहे.

आनंद शिंदे यांनी गेली काही वर्षे भीम जयंतीबरोबरच चळवळीतील अनेक नेत्यांसाठी सभेआधी व्यासपीठावर गीत गायन केले आहे. त्याला मी ‘ समाजसेवा’ म्हणणार नाही. कारण तो एक ‘व्यवहार’ होता. तिथे  सभेला गर्दी जमवणे ही नेतृत्वाची गरज होती आणि त्या बदल्यात आनंद शिंदे यांना मानधन (बिदागी) मिळाली होती. मात्र तो व्यवहार केला म्हणून चळवळीवर भाष्य करण्याचा आणि स्वतः काही राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे यांनी गमवावा हा कुठला न्याय झाला?

शिवाय, आनंद शिंदे आणि उत्कर्ष शिंदे  यांना राजकारणात पदार्पण करण्याचा आणि त्यासाठी कोणत्याही पक्षाची निवड करण्याचाही पूर्ण अधिकार आहे. तो कोणालाही नाकारता येणार नाही.

रिपब्लिकन राजकारणातही नेतृत्वाने ‘राजकीय अस्पृश्यता’ मोडीत काढलेली आहे. पँथर रामदास आठवले यांच्या रिपाइंने सहा वर्षापूर्वी शिवसेना – भाजप यांच्यासोबत युती करून रिपब्लिकन पक्षासाठी आत्मघातकी ठरलेले एक पक्ष धार्जिणे राजकारण संपुष्टात आणले आहे. तर, दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर हे वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना सोबत घेऊन परिघाबाहेरचे राजकारण करत आहेत. त्यांचा भर एकजातीय राजकारण तोडण्यावर आहे.

अशा परिस्थितीत नेत्यांनी कोणत्याही पक्षाशी केलेली युती स्वीकारली जात असताना तेच स्वातंत्र्य आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे यांना पक्ष प्रवेशाच्या बाबतीत कसे नाकारणार?

आंबेडकरी कलावंत कसे जगले आठवा

आंबेडकरी चळवळीची व्रतस्थपणे सेवा करण्यात जलसाकारांपासून  असंख्य कवी, गायक,कलावंत यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यातील वामनदादा कर्डक यांना समाजाने ‘महाकवी’ ही गौरवपर उपाधी बहाल केली बस्स. पण त्यांच्यासहित अनेक महान कलावंतांची झालेली अखेर भूषणावह अजिबात नव्हती. कवी श्रीधर ओव्हाळ, गोविंद म्हशीलकर, नवनीत खरे, राजस जाधव अशी अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील. कलेला जगण्याचे साधन बनवण्याचा ‘व्यवहार ‘ न जमल्यामुळे अनेकांची शोकांतिका झाली.
शाहीर विठ्ठल उमप यांनी तर नागपूरच्या दीक्षाभूमीवरच भर कार्यक्रमात अखेरचा श्वास घेतला होता. वाताहतीपासून त्यांनी  स्वतःला कसे वाचवले हे इथे लक्षात घेतले पाहिजे. 1980 चे दशक उजाडताना ‘लोकसत्ता’ चे तत्कालीन संपादक विद्याधर गोखले यांचा वरदहस्त लाभलेला ‘गीत सिद्धार्थ’ हा व्यावसायिक कार्यक्रम मंचावर आला होता. त्याच्याशी स्वतःला जोडून घेतानाच विठ्ठल उमप यांनी बुद्ध -भीम जयंतीच्या काळातच तेजीत असणाऱ्या कव्वाली कार्यक्रमातून अंग काढून घेतले होते. नंतरच्या काळात त्यांनी कलेच्या क्षेत्रात स्वतःला मुख्य प्रवाहाचा भाग बनवण्यावरच आपले सारे लक्ष्य केंद्रित केले होते. हे व्यावसायिक भान राखल्यामुळेच त्यांचा अखेरचा काळ सुसह्य बनला होता.
रेशमी गळ्याचे वरदान लाभलेले गायक प्रल्हाद शिंदे यांना तर व्यावसायिक भान सर्वात आधी आलेले पहिले कलावन्त म्हणावे लागेल. आकाशवाणी- रेडिओवर सर्वाधिक गाणी गायलेला गायक म्हणून त्यांचाच विक्रम असेल. गीताला आपला ‘आवाज’ देताना शिंदे यांनी आप-पर भाव कधीच न मानता कलावंताचा व्यवसाय धर्म पाळला. म्हणूनच ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता’ अशा भावगीतांपासून ‘दीक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जगी’, ‘पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे’ अशी आंबेडकरी गीते आणि ‘उड जायेगा एक दिन पंछि’ सारख्या कव्वाल्याही त्यांनी गायल्या.

प्रल्हाद शिंदे हे नामदेव ढसाळ यांच्याप्रमाणे बिनधास्त आयुष्य जगले. अहोरात्र दलित नेते आणि कार्यकर्ते यांच्यासोबत वावरले. पण परधर्म द्वेष आंबेडकरी समाजात भिनवला जात असल्याच्या आजच्या काळात ‘ऐका सत्यनारायणाची कथाsss’ हे गीत गायलेल्या प्रल्हाद शिंदे यांना मुक्तपणे फिरता आले असते काय, हा प्रश्न आता पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *