देशात सध्या मंदीचं वातावरण असून त्याचा फटका हा जवळजवळ सर्वच क्षेत्राला बसत आहे. यामुळे अनेकांच्या नोकरीवरही  गदा आलेली आहे. पुण्यातील आयटी क्षेत्रातील तरुण याच चिंतेमुळे सध्या नैराश्याच्या छायेत लोटले जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिच्या वातावरणात नोकरी जाण्याच्या भीतीपोटी नैराश्य येऊन पुण्यातील अनेक तरुण हे मानसशास्त्रांचा सल्ला घेत आहेत. तर यामध्ये सर्वधिक प्रमाण हे आयटी क्षेत्रातील तरुणांचं असल्याचं  मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं.

पुण्यासारख्या शहरात आयटी क्षेत्राचं जाळ मोठ्या प्रमाणात आहे. तसंच येथे मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग काम करतो. मात्र गेल्या काही आठवड्यांत आयटी क्षेत्रात जाणवणाऱ्या मंदीमुळे तरुणांवर नोकरी टिकवण्याचा तणाव आला आहे. शहरातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अधिकतर तरुण हे निद्रानाश, मानसिक तणावाचा सामना करत आहेत. यासर्वांतून मार्ग काढण्यासाठी ते मानसशास्त्रांचा सल्ला घेत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

‘सध्या आयटी क्षेत्रात काम करण्याबाबत बरीच अनिश्चितता आहे. जी यापूर्वी कधीही जाणवली नव्हती, असं मत मानसोपचार घेतलेल्या हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने मांडलं आहे. सध्या प्रत्येकाच्या मनात आपल्याला केव्हाही कामावरून काढले जाईल, अशीच भीती सतत आहे. दरम्यान, तरूणांची ही अवस्था चिंतेची बाब असल्याचं बोललं जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *