पुण्यात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात पाणी शिरलं होतं. रात्री ११ च्या सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला होता. या मुसळधार पावसामुळे वसतिगृहातील तळमजल्यावर अचानक पाणी शिरलं. पाण्याचा जोर दिसताच वसतिगृहातील मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं.

या वसतिगृहात सुमारे २०० मुली राहतात. महाविद्यालयाच्या मागील भागातील भिंत थोडी खचली होती. पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे भिंत कोसळली आणि वसतिगृहात पाणी शिरलं. महाविद्यालयातील शिपायांनी लगेच मदत केल्यामुळे जीवितहानी टळली.

दरम्यान, महाविद्यालयातील ग्रंथालयात, इतर ऑफिसमध्येही पाणी शिरलं. ग्रंथालयातील अनेक पुस्तकं भिजली. रात्री ११ वाजल्यापासून सकाळपर्यंत पाणी काढण्याचं काम सुरू होतं. संभाव्य धोका टाळण्यासाठी वसतिगृहातील सगळ्या विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *