आगामी विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. मात्र आता काँग्रेस सोबत आमचं जमणार नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं.

राज्यात ज्या धर्मनिरपेक्ष पक्ष संघटना आहेत त्यांना आम्ही कधीही वगळणार नाही. मात्र, एमआयएम सोबत होणाऱ्या आघाडीवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. दोन ते तीन दिवसात आमची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच काँग्रेसला ४२ जागांची ऑफर दिली होती. तीन आठवडे होत आले तरीही काँग्रेसकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. आम्ही आता यावर फार बोलणार नसल्याचं ते म्हणाले. राज्यात सीपीएम च्या एका गटाशी चर्चा सुरू असून आपशी देखील चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र मनसेला आम्ही बरोबर घेणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. राज्यात सेना भाजपची युती असली नसली तरी आम्हाला फायदा आहे. दरम्यान, राज्यात २४० मतदार संघात आमचा सामना सेना-भाजपशी असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, वंचित आघाडीला ऑल इंडिया उलेमा बोर्डाने पाठिंबा जाहीर केल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. वंचित सोबत त्यांची बैठक झाली असून त्यात मुस्लिमांना शिक्षणात १० टक्के आरक्षण द्यावं, मॉबलिंचींगसाठी कायदा झाला पाहिजे तसच वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या लोकांनी बळकावल्या त्या बळकावलेल्या जमिनी मिळाव्यात, अशा मागण्या त्यांनी वंचित आघाडीकडे केल्या आहेत. यासह आम्ही राज्यात २५ मुस्लिम उमेदवार जाहीर करणार आहोत. यामध्ये ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या उमेदवारांची नावं असतील. तसच मौलवी यांनी आम्हाला पाठिंबा दिला असून त्यांची प्रचाराला मदत होणार असल्याचं आंबेडकर म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *