आपण साऱ्यांनी काल झोमॅटोचं तोंडभरून कौतुक केलं हे योग्यच होतं. पण ज्या इसमाने, ‘एक मुसलमान माणूस मला माझं जेवणाचं पार्सल आणून  देत  असेल तर मला चालणार नाही’, असं म्हटलं. त्याचं आणि त्याच्या मनातल्या त्या भावनेचं काय करायचं?  ‘माझ्या अन्नाला मुसलमानाचा स्पर्श होत असेल तर ते शुद्ध अन्न अपवित्र होतं आणि मला ते अन्न खावंसं वाटत नाही’, असा विचार जर  त्या इसमाच्या डोक्यात येत असेल तर त्या मानसिकतेचं काय करायचं हा प्रश्न अनुत्तरितंच राहतोय.

एक लक्षात घेऊया, ती भावना उघडपणे समाजमाध्यमांमध्ये व्यक्त करताना त्या इसमाला काहीही गैर वाटलं नाही. कारण  मुळात एक  रक्ता-मांसाचा जिवंत माणूस केवळ एका विशिष्ट जाती-धर्माचा असल्यामुळे मी त्याचा टोकाचा तिरस्कार करतोय, तो हीन आहे असं मानतोय आणि हे मानणं अतिशय असंस्कृत आणि असभ्यपणाचं  आहे, असं काही त्या इसमाला वाटतंच नाहीये. हा इसम लिंचिंग सारख्या समाजातल्या हिंसक प्रकारांनाही योग्य मानून अशा गोष्टींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष  संमती देणारा असणार आहे.

प्रसिद्धीस पावलेली ही एकच घटना दिसण्यात आली  असली तरी दुर्दैवाने आज काल अशी मानसिकता  अनेक ठिकाणी डोकावताना नव्हे तर राजरोसपणे व्यक्त होताना  दिसतेय.

अगदी दोन तीन वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतोय…नातेवाईकांमधल्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. बोलता बोलता विषय कुठेतरी वळला आणि एक लांबच्या नातेवाईक ताई दुसऱ्या एका वहिनींना सांगून गेल्या, “अगं परवा एक सुतार बोलावला फोन करून खिडकी दुरुस्त करायला आणि चक्क एक मुसलमान पोरगा आला दारावर! मला कळलंच नसतं एरव्ही. नाव विचारलं म्हणून वाचले! आल्या पायी तसाच परत पाठवलं मी त्याला!  काय गं हल्ली पोषाखावरुन काहीच  कळत नाही!”
ह्या ताईंचं  एका विषयात एम.ए. पूर्ण झालंय आणि दुसरं आणखी एका विषयात करताहेत.

दुसरे एक जवळचे नातेवाईक दादा एका पर्यटनस्थळी गेले आणि वाटेवरच्या एका हॉटेलात जेऊन बाहेर पडता पडता त्यांच्या लक्षात आलं की जेवण करणारा आचारी मुसलमान होता. झालं ह्यांचा मूडच गेला. त्यांना पोटात कसनुसं होऊ लागलं. हॉटेल बाहेर पडून, गाडीत बसण्याआधीच ह्या माणसाने काय करावं? त्यानं दोन ग्लास मीठपाणी गटागटा प्यायलं आणि घशात बोटं कोंबून चक्क उलटी काढली.

ह्या दोन्ही गोष्टी सुन्न करणाऱ्या होत्या. चीड आणणाऱ्या होत्या. भयानक होत्या!

पहिली गोष्ट घडली तेंव्हा मी तिथे उपस्थित होतो. ताईंचा मान ठेऊन मी स्पष्ट शब्दात माझी नापसंती व्यक्त केली होती. दुसरा प्रसंग माझ्या भावाने घडल्यानंतर काही दिवसांनी सांगितला. त्यामुळे त्याविषयीची प्रतिक्रिया त्या दादांना देता आली नाही किंवा ‘घडून गेलं’ हे  निमित्त करून मी त्या अनुषंगानं येणारी कटुता सोयीस्कर रित्या टाळली.  पण त्यानंतर त्या दादांशी कोणताही संवाद करावासा वाटला नाही हे सुद्धा खरं आहे. उलट अजूनही कधीतरी त्यांना सांगावसं वाटतं की तुमच्या  ह्या अशा वागणुकीची लाज वाटली पाहिजे तुम्हाला.

माझ्या घरी मात्र आता कोणत्याही सण समारंभात जेवण असेल तर आम्ही कटाक्षाने मुसलमान आचारी बोलावण्याची प्रथा तेव्हापासून कुटुंबात सुरु केली आहे.

पण काय करावं ह्या तिरस्काराच्या वाढत्या भावनेचं? त्या भावनेला जाहीरपणे मिळत असलेल्या स्वीकृतीचं? प्रतिष्ठेचं?

समाज म्हणून आता कुठे आम्ही अस्पृश्यतेच्या हिणकस प्रवृत्तीमधून बाहेर पडत होतो. मग सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित समाजाला आज हे पुन्हा झालंय तरी काय?
बोलण्या वागण्यात अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवणारी, दर सुट्टीत युरोप टूर करणारी, आपल्या कुत्र्या मांजरांनाही बेडरुमधे झोपवणारी ही माणसं  अशी जिवंत माणसाबद्दलच्या द्वेष आणि तिरस्काराच्या आजाराने ग्रस्त कशी काय झाली आहेत?

मी तरुणांशी, मुलांशी ह्याबद्दल सतत बोलतोय. ह्या आजारांपासून निदान नवी पिढी दूर राहावी असा प्रयत्न करतोय. गांधी म्हणतात, द्वेष-तिरस्कार वर दिसत असेल तर त्यामागे खोलवर लपलेली भीती असते. तरुणांबरोबर ह्या भीतीवर, असुरक्षिततेच्या भावनेवर खूप काम करावं लागेल. सातत्याने  आपल्याला सर्वांना हे प्रयत्न करावे लागतील.

पण केवळ ही  प्रबोधनाच्या भूमिका घेऊनही भागणार नाही.

सुसंस्कृतपणाच्या बुरख्याखाली माणसाचा तिरस्कार करणारी ही सडकी मानसिकता आजपर्यंत लोक लपवून ठेवत होते. आज ते उघडपणे ती मिरवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. कधी दलित समाजाबद्दल तर कधी मुसलमान-ख्रिश्चन धर्मियांबद्दलचा हा तिरस्कार मनात घेऊन आपलीच माणसं आपल्या आजूबाजूला वावरताना दिसताहेत.

यापुढे असं वर्तन करताना आपल्या परिचयातली माणसं आढळल्यास त्यांना आपण थांबवलं पाहिजे. मुसलमान किंवा दलित आहे म्हणून जर वेगळं वर्तन होत असेल तर त्याचा उघड तिथेच निषेध करायला हवा. आधुनिक जगातल्या सर्व समाजात अशा वंशवादी वृत्तीचा धिक्कार होतो आणि  अशी वागणूक सुसंस्कृत समाजात लैंगिक अत्याचारासारख्या  गुन्ह्या इतकीच निंदनीय आणि भयानक आहे हे आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे. इतके तरी आपण धैर्य दाखवून आपल्या परिचयातील माणसांबद्दल करू शकतो. यातून तात्पुरती वैयक्तिक कटुता येईल पण शाश्वत मूल्यांबद्दल आज आपण जागृत राहिलो नाही तर उद्या ही कटुता संपूर्ण समाज व्यापून टाकेल.

@आशुतोष शिर्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *