महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ED ने नोटीस बजावल्याचे पडसाद उमटले आहेत. एका बाजूला मनसेने उद्या बंदची हाक दिलीय, तर दुसरीकडे ठाण्यात एका तरूणाने स्वत:ला पेटवून दिलंय. अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी असं हे कृत्य आहे.

खरंतर ED ची नोटीस म्हणजे चौकशीची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे हे प्रकरण लगेच इतक्या टोकाला जाता कामा नये. इतर मार्ग आहेतच.

मात्र ED ची सध्याची जी कार्यपद्धती दिसतेय ती संशयविरहीत आहे असं छातीठोकपणे सांगता येतंय का? ED हे सरकारच्या हातातील एक बाहुलं आहे, या आरोपाला पुष्टी मिळेल अशाच नोटीसा निघतायत. छगन भुजबळ प्रकरणात तर हे उघडच झालं. कोणतं आरोपपत्र ED ने ठेवलंय? मग अडीच वर्ष भुजबळांना तुरूंगवास का घडला? याची उत्तरं नाहीत.

हीच भीती आता राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना वाटते आहे. राज यांच्यावर नोटीस का बजावली गेली हे उघड आहे. सरकारवर त्यांनी उघडपणे केलेली टीका हेच याचं उत्तर आहे, हे रस्त्यावरील कुठला माणूस सांगेल. ही ED ची सामान्य माणसाच्या मनांत असलेली प्रतिमा आहे. आणि हे बळावलं तर ते अराजकाला आमंत्रण ठरेल. यंत्रणांवरील विश्वास हाच कायदा-सुव्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळे ED चीच ही परीक्षा आहे.

तुर्त आपण शांतता आणि संयम राखायला हवा…!

– संपादक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *