काल रांधलेला स्वयंपाक ‘वापरला’ नाही की ‘शिळा’ होतो नि ‘शितळासप्तमी’ला सगळं ‘शिळं’ खायची रूढी! माझ्या मनात आलं ह्या ‘शितळासप्तमी’ला गतकाळातले ‘रूढ’ परंतु वापरात न राहिल्याने ‘शिळे’ झालेल्या शब्दांचं ‘सेवन’ करावं, म्हणून हे
लेखन…

“शितळासप्तमी-शब्दांची”

“ए आज्जी गं, बोअर होतंय गं! सगळे फ्रेंड्स कुठे कुठे गेलेयत व्हेकेशनमध्ये!”
रोहिनची ही खास ‘मे’-तक्रार!

मे महिन्यामधल्या ‘मे-फ्लॉवर’ सारखाच,  मुलांच्या ‘कंटाळ्या’ ला सुध्दा बहर येणं हे अगदी स्वाभाविक नि पारंपारीक!

“रोहिन चल माझ्याबरोबर कोकणात! तुझ्या आई-बाबांना वर्क प्रेशर मुळे रजा नाही. पण आपण दोघं जाऊ शकतो निलम-आजीबरोबर. अगदी अस्सल आंबे खायला मिळतील तिथे!” मी त्याची प्रतिक्रिया आजमावत म्हटलं.

“काssय? अस्सल मिन्स?”

“हुंss! म्हंजेawesomeटेस्टचे!”
दोन-तीन दिवस जरा डिफरंट ॲटमॉसफिअरमध्ये! ‘राहतं घर’ आहे तिथे भलं मोठ्ठं!”

“काय बोलतेयस तू आजी?
‘रहातं घर’ ’घर’ कसं राहील? जनरली घरात रहातात नं?”
भुवया उंचावलेली रोहिनची मुद्रा बघतांना मजा वाटली मला.

“अरे, असं म्हणायची पध्दत आहे नि त्याचा अर्थ निलम-आजीचे २ कझिन ब्रदर्स  कायम तिथेच राहतात. आजकालच्या फॅशनसारखं सेकण्ड होम नाहिये ते. एकदम खास कोकण स्टाईलचं घरै!”

“सही!! जाऊचया आपण!”

माझा प्रस्ताव उचलूनच धरला नातवाने आणि मी आणि माझी मैत्रिण-निलम, आम्ही दोघींनी कोकण प्रवासासाठी गाडी रेंटवर ठरवली सुध्दा! अर्थातच तिच्या नातवाची कंपनीही होती रोहिनला. त्यामुळे मला खात्री वाटत होती त्याच्या रमण्याची!!

कोकणप्रवासाला निघायचं म्हणजे-
“एकदा तो प्रवास घडला की जगात कुठेही जाता येईल होs s  जावईबापू”
हे पुलंचं वाक्य हमखास आठवतं.
प्रवासात येणाऱ्या अडचणी, होणारा विलंब हे सगळं गृहितच धरलं होतं मनात!
परंतु vacations मध्ये flights नि international tours ना जाण्याच्या हल्लीच्या प्रथेला डावलून नातवाला एकदम कोकणात घेऊन जायच्या प्लॅनचं बारिकसं टेन्शन होतंच नाही म्हटलं तरी!!

कसं कोण जाणे, पण अगदी इन टाईम आणि सुखरूप पोचलो वायंगणीला!

गाडीतून उतरलो आणि कोकणचं वैशिष्टय असलेलं ते खास ‘कौलारू’ घर बघितलं मात्र नि सहजच, “WOW” निघून गेलंच रोहिनच्या तोंडून!!

“या! या!! आम्ही केव्हाची वाट बघतोय! जरा ह्या बाजूनं या, त्या विहिरीजवळच्या वाटेवर थोडंसं निसरडं झालंय म्हणून म्हणत्ये हो!
ते सामानाचं बघेल गोप्या सगळं”

सुहास्य मुद्रेनं अन् खणखणीत आवाजात त्या घरच्या ‘पणजीनं’
(मैत्रिणीची काकू, वय वर्षे ८८) आमचं सूचनायुक्त स्वागत केलं.

‘विहिर अन् निसरडं’ वरून आम्ही घसरायच्या आधीच ते दोन्ही शब्द रोहिनच्या डोक्यावरून घरंगळलेले माझ्या लक्षात आले म्हणून त्याचा हात धरून मी म्हटलं,
“सावकाश रे बाबा, विहिर म्हंजे well आणि तिच्या अराउंड वेट फ्लोअर आहे, म्हणून be careful असं सांगतायत त्या.”

“ओ वेल! विहिर मिन्स ‘वेल’ होय!! सहीच!”
गोष्टीच्या पुस्तकांची ‘स्टोरी बुक्स’ झाल्यापासून आताशा मुलांना विहिर ‘दगडी’ असली तरी परिचय ‘वेल’ असाच आहे बहुतकरून!
“मुंबैवरनं यायचं म्हंजे लांबचा पल्ला नाही म्हटलं तरी तडक न्हाणीघरात जाऊन हात-पाय धुवून घ्या म्हंजे ताजंतवानं वाटेल हो! घंगाळात मगाशीच पाणी उपसून ठेवलंय, या असे सगळे”
“आज्जी, ‘घंगाळ, न्हाणीघर ’
आणि ‘पाणी’ उपसून म्हणजे?
मागे एकदा गोष्टीतल्या तलवारीला तू ‘उपसून’ म्हटलं होतंस नं? exam hallमध्ये आल्यासारखं वाटतंय गं!
“न्हाणीघर म्हणजे बाथरूमच पण टॉयलेट ॲटॅच नसलेलं “

(आतासं असं झालंय,’नाती’ एका बोटावरची अन् विशेष ॲटॅच नसलेली, पण ‘ॲटॅच्ड’ टॉयलेट वाली बाथरूम्स अगदी मस्टच, असा एक विचार डोकावलाच मनात रोहिनला सांगता सांगता)

रोहिनच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव बघून आलेलं हसू आवरलं नि मी त्याला न्हाणीघरात घेऊन गेले.

“ओss! WOW !! सोss big
लाईक अ room !!!”

मग न्हाणीघरातला बंब, मोठ्ठा काळा दगड इ. ची माहिती पुरवता पुरवता आम्ही हातपाय धुवून घेतले.

(सुट्टीत सगळे जमल्यावर मुलगे नि पुरूष मंडळी बऱ्याचदा ‘दोणी’ जवळच आंघोळ करतात पण, ‘आज्जी, कोणी म्हणतेयस की दोणी? आणि दोणी म्हणजे?’ अशा
सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल म्हणून ही माहिती मी दिलीच नाही. )

सगळे फ्रेश होऊन, कोकणस्टाईलच्या ‘मधुर’ चहाचा आस्वाद घेऊन फळांच्या बागेत जाऊन थडकलो.

“आज्जी, लूक!  मॅंगोज आन द ट्री! मी टच करून पाहू?”

मुंबईत फक्त बॉक्समधले आंबे बघायची सवय असलेला रोहिन असे किंचित रंग पालटलेले ‘लाईव्ह’ आंबे बघून thrilled झाला.

खरंतर, अगदी जमिनीलगतही लागलेले फणस, चिकूंनी लगडलेली ‘चिकवीण’, लटकलेली केळफुलं- वर्णन करायला शब्द अपुरेच पडतील अशा त्या बागेतल्या फेरफटक्याने आम्ही मैत्रिणीही सुखावलो.

“चला गो सारी आत! उरलेला फेरफटका उन्हं उतरणीला आली की मारता येईल हो! पाटपाणी घेऊन झालंय, पानेंही वाढल्येत.
आधणात वैरलेला आंबेमोहरचा भात आहे, ‘उनउन’ खाऊन घ्या हो.”

पुन्हा एकदा काकूंची सानुनासिक नि खणखणीत सूचना आली आणि
इकडे रोहिनची प्रश्नपत्रिका आलीच.
“आज्जी, व्हॉट इज पाट-पाणी?
ममा तर सारखी ‘सन-स्क्रीन’ लाव म्हणत असते नि ह्या पणजीआजी ‘उन उन खा’ असं कसं काय  म्हणतायत?”

झाss लं, परत माझी उत्तरपत्रिका तयार करणं नि रोहिनला समजावणं सुरू.

त्या त्या ठिकाणची पाण्याची म्हणा की सुगृहिणीच्या हातची
चव  म्हणा, ते गरमागरम जेवण, ४ घास जास्तच गेले सगळ्यांना! त्यात दारच्या आंब्यांचा रस, मग काय, सगळ्यांची तृप्ती डोळ्यात उतरायला कितीसा वेळ?

“माजघरात हातरया पसरल्यात मगाशी गोप्याने! आचवून झालं की पडा जरा निवांत! नाही म्हटलं तरी प्रवासाचा शीण होतोच हो!
‘झाकपाक’ झाली की आम्ही दोघी सास्वा-सूनाही येतो जरा लवंडायला. म तुमचे ते पत्ते-बित्ते नंतर खुश्शाल खेळा हो. काय रोहिन चालेल नं?”

पणजीआजीचे अर्धेअधिक वर्डस् डोक्यावरून  गेल्याने कावराबावरा झालेला रोहिन शेवटच्या प्रश्नाने दचकला एकदम! त्याच्या मदतीला धावून जात मीच पणजीआजीला उत्तर दिलं आणि हातरीचा यथायोग्य वापर करत ‘हातरी’, ‘आचवणे’, ‘शीण’ इ. शब्दांचा परिचय करून दिला रोहिनला.

पत्त्यांचा खेळ, मनमुराद भटकंती नारळ-पोफळीच्या बागेतली, जिरेपूड घातलेल्या कोकम सरबताचा आस्वाद घेत  घेतलेला विसावा, पानाच्या द्रोणातली करवंद….ह्या आगळ्या-वेगळ्या (kind of unplugged )गोष्टींमध्ये आम्हा दोघींची नातवंडं रमली नसती तरच नवल!!
खरोखर, २ दिवस अगदी मज्जेत गेले कोकणात!

“काय रोहिन, आवडलं की नई आमचं घर? पुढच्या वर्षी आठेक दिवस तरी  ये रहायला, एकट्याने यायलाही हरकत नाही, आता ओळख झालेय आपली, काsय?”

पणजीआजींनी निघताना विचारलं.

“Well, घर तर awesome च आहे आणि मजाही आली खूप! पण एकटा नाही, इथे येतांना ही dictionary हवीच बरोबर.”

माझ्याकडे बोट दाखवून दिलेल्या रोहिनच्या उत्तराने अवघं घर हास्यरंगात रंगलं अन्

आम्ही मुंबैच्या दिशेनं मार्गस्थ झालो.

 © अनुजा बर्वे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *