राजांचं राजेपण जातं. पण सरदारांचं सरदारपण नाही. सरदार कायम सरदारच असतो. राजा बदलायचा आणि आपली वतनं जपायची. सरदाराची सत्ता राजांमुळे जात नाही. राजांची जाते. सरदार सत्ता सोडत नाही. थेट राजा बदलतात.

काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे. भाजप गाठणारे बघितले की वाईट वगैरे वाटणं तर सोडा आश्चर्यही वाटत नाही. एकच मनात येतं. तुम्ही सरदारपण जपलं.

विखे, मोहिते, नाईक, भोसले, जगताप यांना राजा बदलताना बघून अजिबात आश्चर्य नाही वाटलं. त्यांनी तर मराठ्यांची महान परंपरा जपली. कधी कुतूबशाह, कधी आदिलशाह आणि कधी मुघल. ज्याचं राज्य त्यांचे सरदार. फक्त यांची वतनदारी जपायची. यांची वतनं, जहांगिरी म्हणजे यांनी निर्माण केलेलं राज्याअंतर्गतचं राज्य. त्याच्यावर गदा आली नाही, म्हणजे झालं. या सरदारांनी कित्येक राजांना बुडवलं. मरायला सोडून दिलं. पण त्यांच्या वतनावर टाच नाही येऊ दिली. त्यांना जनतेशी काहीही देणंघेणं नव्हतं. आजही नाही. त्यांचा मतलब फक्त त्यांच्या जहागिरीशी-वतनदारीशी होता. आहे. राहिल कायम.

एका छत्रपती शिवरायांनी ही मतलबी जमात ओळखली. छत्रपतींना कळलं होतं. यांच्यासारखे नालायक कुणाचे नाहीत. हे राज्य बुडवणार. म्हणून शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद केली. पगारी नोकरीवर नेमलं. जहागिऱ्या वाटणं बंद केलं. जहागिरीवर टाच येताच हे सगळे शत्रू झाले शिवरायांचे.

दुर्दैव म्हणजे छत्रपतींची दूरदृष्टी कुणाकडेही नव्हती. पेशव्यांनी परत जहागिरी दिल्या. वतनं दिली. आणि या सरदारांना बळकटी आली. इंग्रजांनीही यांना दुखावलं नाही. नामधारी तर नामधारी पण राजेपण जपलं. इंग्रजांना माहित होतं यांना दुखावल तर त्यांच्या वतनासाठी हे एकत्र होतीलं. आणि इंग्रजांनी ती चूक केली नाही. वतनं, जहांगिऱ्या कायम ठेवून, सरदारांना टाचेखाली आणलं.

इंग्रज गेल्यावर काहीकाळ ही जमात सैरभैर झाली. थोडी बिचकली थोडी बिथरली. पण हळूहळू आपलं बस्तान मांडलंच.

राजे गेले. लोकशाही आली. आदिलशाह, निजामशाह, मुघल, इंग्रज गेले. नवी संस्थानं जन्माला आली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, समाजवादी पार्टी.

आणि निर्माण झाले साखर सम्राट, शिक्षण सम्राट. हे सम्राट लोकशाहीत वतनदारीची नवी नावं होती. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, भूविकास बँका आणि बरच काही. राजेशाही ते लोकशाही अगदी स्मूथ ट्रान्झिक्शन केलं या सरदारांनी. या सरदारांइतकं चांगलं transiction कुणालाचं जमलं नाही.

महाराष्ट्राच्या  ‘जाणत्या राजा’ समोर ही संस्थानं पुन्हा उभी राहली. किंबहुना उभी राहु दिली गेली. मग या सरदारांनी बक्कळ पैसा कमावला. मनी पॉवर, मसल पॉवरच्या जोरावर आपली-आपली संस्थानं बळकट केली. राजाला पैसा दिला. राजाच्या लढाया लढल्या. लढायला माणसं दिली. आणि पैसाही दिला. आणि आपली वतनं, जहांगिऱ्या राखल्या. ज्याची सत्ता‌ त्याचा झेंडा खांद्यावर.

काँग्रेसची चलती. 
संस्थान – काँग्रेस
महाराणी – सोनियाची गांधी 
नारा- सोनिया गांधी की जय !

पवारांची चलती.
संस्थान- राष्ट्रवादी. 
राजे – शरदचंद्रजी पवार साहेब.
नारा- साहेब तुम आगे बढो! हम तुम्हारे साथ है!

शिवसेनेची चलती.
संस्थान – शिवसेना
राजे – उद्धवसाहेब ठाकरे
नारा – शिवसेना जिंदाबाद!

नवा पत्ता 
संस्थान- मौजे भाजप
राजे – नरेंद्रभाई मोदी 
नारा – नरेंद्र मोदी जिंदाबाद….अमितभाई शाह जिंदाबाद

या सर्व सरदारांना फक्त एकच प्रश्न. लाज नाही वाटत तुम्हाला?

कधी नेहरू, कधी इंदिरा तर कधी राजीव गांधींच्या नावावर निवडून आलात. इंदिरा आणि राजीव गांधींचा तर मृत्यूही तुमच्या पथ्यावर पडला होता. अरे गलितगात्र झाल्यावर, सोनियाला घेऊन आलात. मग तिच्या नावावर जिंकलात. आज त्याचं इंदिरा गांधींचा नातू, राजीव-सोनियाचा मुलगा पराभवाच्या जखमा घेऊन लढायला उभा राहतोय. आणि तुम्ही मागच्या-मागे पळ काढलात.

तुमचा ‘जाणता राजा’ या वयात फौज उभी करतोय. त्यालाही एकटं पाडलंत. तुम्ही निवडूणही याल. तुमची संस्थानही आणखी भक्कम होतील. सरदार म्हणून मिरवाल. पण एक खरं-खरं सांगा आरशासमोरतरी तुम्ही तुमच्या नजरेला नजर देऊ शकता का?

वतनदारी-जहांगिरी, मान-अपमानासाठी तुम्ही संभाजीचा सौदा केला. तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय?

सरदाराच सरदारपण कालपण आजपण आणि उद्यापण…!!!

@अमित मोडक

(8879993608)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *