तीन बॉल पाच रन…त्यानंतर एक बाँल तीन रन असे आकडे स्क्रीन वर झळकत राहीले. आणि प्रेक्षकांची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढवित राहीले. अतिशय रोमहर्षक ठरलेली ही फाईनल मॅच शेवटी इंग्लंडने जिंकली. न्युझिलंडचा खेळही सन्मानजनक होता. खर पाहीलं तर ही मॅच इंग्लंडने जिंकावी ही नियतीचीच इच्छा होती असे काल दिसले.

भारताची गैरहजरी असलेली मॅच सहसा मी पाहत नाही. तुम्ही समजता तस देशभक्ती वैगरे काही नाही पण मॅच पाहतांना साधारणता कुठलीतरी एक बाजू आपली मानावी लागते मग मॅच पाहण्याचा आनंद लुटता येतो. भारत खेळात असला की आपली बाजू ठरलेली असते. कालच्या मॅचमधे मी डोक्यापेक्षा मनाने विचार केला व इंग्लंडची बाजू घेतली होती. त्यामुळे इंग्लंड जिंकल्यावर मला आंनद झाला. पण या आंनदामागे काही संवेदनाही होत्या.

क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमधे झाला. ब्रिटिशांनी सर्व जगभर वसाहती निर्माण केल्या. जिथेजिथे ते गेले तिथे ते आपल्या सोबत क्रिकेट घेवून गेले. ब्रिटिश गेल्यानंतर स्वतंत्र झालेल्या ब-याच देशात क्रिकेट हा जवळजवळ राष्ट्रीय खेळ असल्यासारखा खेळला जातो. यात भारतही आहे. भारतात हा सभ्य लोकांचा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे हे आपण अनूभवतो. मध्यंतरी या सभ्य लोकांच्या खेळात काही असभ्य गोष्टी घडल्यामुळे लोक नाराज झाले होते. तरीही क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली नाही. भारताने दोनदा जागतिक चषकावर आपले नाव कोरले आहे. मात्र ज्या इंग्लंडने हा खेळ निर्माण केला ते मात्र वल्ड कप कधीच जिंकले नव्हते आणि ती भळभळणारी जखम कालच्या न्युझीलंड विरोधातील सामना जिंकून त्यांनी बरी केली.

या विजयाच्या निमित्ताने इंग्लंडच्या काही चांगल्या गोष्टीवर प्रकाश झोत टाकणे मला गरजेचे वाटते. इंग्लंड हा उदारमतवादी देश असून तिथली लोकशाही परीपक्व आहे. विचार स्वतंत्र तिथे फक्त घटनेतील पान नाही तर ते लोकांच्या व्यवहारात भिनले आहे. सरकारवर टिका केली एखाद्या समुहा बद्दल काही टीकात्मक लिखान केले म्हणून तिथे थिएटर बंद पाडणे जाळपोळ हे प्रकार घडत नाहीत. उलट अशा साहीत्यिक कलावंताना ते संरक्षण देतात. यामुळे जिवन समृद्ध जगण्याच्या दृष्टिकोनातून ते जगाच्या बरेच पाऊले पुढे आहेत हे दिसते.

भारतातील राज्यकर्त्यांनी फोडा आणि राज्य करा हे तत्व उचलले पण त्यांचा उदारमतवाद घेतला नाही. कामाच्या प्रति असलेली निष्ठा घेतली नाही. इथे बांधलेले पुल उद्घाटना पुर्वी कोसळण्याच्या स्थितीत येतात. तर ब्रिटिशाने बांधलेले पुल शंभर वर्षानंतर मजबूत स्थितीत असलेले दिसतात. आणि भारतातील कोणत्या पुलाची कीती गॅरेन्टी आहे याचे रिमांडर पाठवण्याची क्रियाशीलता व मोठेपणा त्याच्यात आहे तो आपण कधी घेणार? इथे समुह हत्या होतात मारणारे याच देशातले मरणारे याच देशातले तरी याबद्दल म्हणावे तशी ठोस कारवाई करतांना राज्यकर्ते दिसत नाही. आणि लोक बंधुत्व विसरताना दिसतात. या सा-या गोष्टी या निमित्ताने बोलल्या गेल्या पाहीजेत.

इंग्लंडला मॅच जिंकून देणारा स्ट्रोक याने जिंकल्यानंतर अतिशय संयमित अशी प्रतिक्रिया दिली.त्याची प्रतिक्रिया ऐकल्यावर कळते खरच क्रिकेट हा अजूनही सभ्य लोकांचा खेळ आहे. तो म्हणाला मी आयुष्यभर न्युझीलंडची माफी मागेन कारण रन घेताना त्याच्या बॅटला लागून बॉल सिमापार गेला व इंग्लंडला चार रन मिळाले. खरं पाहीलं तर त्या सा-या घटनाचक्रात त्याचा काही दोष नाही तरीही आपण त्या प्रक्रीयेत होतो आणि त्यामूळे न्युझीलंडचा पराभव झाला यांची जाणीव ठेवून माफी मागणे हे मोठेपणा व सभ्यपणाचे लक्षण आहे. ही सभ्यता व  हे मोठेपण जगाला लाभो तसेच ते भारतालाही लाभो अशी भावना माझ्या मनात निर्माण होते. जगाला शहाणपण देणाऱ्या भारत देशात शहाणपण टीकवून ठेवणे महत्वाचे  आहे!

@राजू रोटे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *