@हेमंत देसाई

राजकारणातील ‘र’ ही ज्यांना समजत नाही, ते वाटेल ते लिहीत सुटले आहेत. घरातल्या घरात बसून, कोणालाही न भेटता, काही एक न वाचता आणि विचारही न करता, शेरेबाजी करणे हा यांचा टाइमपास असतो. ‘काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी घराण्याची राजेशाही आहे’, असे एक अडाणीपणे व्यक्त केले जाणारे मत! ते पुन्हा पुन्हा व्यक्त केले जात असल्यामुळे, त्याबद्दल सामान्यजनांचे गैरसमज दूर केले पाहिजेत, असे वाटले. रोजच्या रोज ज्यांना मोदी यांची भजने आणि शहा यांचे ढोलताशे ऐकून, रात्री अर्णबचे कंठाळी शोज् मान डोलावत बघत, बडबड करण्याची सवय आहे, त्यांनी जरा वास्तव समजावून घ्यावे. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव, सोनिया, राहुल गांधी हे लोकांमधून पुन्हा पुन्हा निवडून आलेले आहेत. हे सर्व नेते काहीएक जनाधार असलेले होते वा आहेत. त्यांना पक्षात सर्वमान्यता होती आणि राहुल यांनाही अपयशाचा सामना करावा लागला असला, तरी त्यांनी 2019 च्या पराभवानंतर स्वेच्छेने अध्यक्षपद सोडले आहे. ‘आमच्या परिवारातील कोणीही अध्यक्ष होणार नाही’ हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पक्ष कार्यकर्ते व नेते मनधरणी करत असूनही, ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि हे कौतुकास्पद आहे. काँग्रेसवर एकाच घराण्याची सत्ता वर्षानुवर्षे असणे अयोग्य आहे, पक्ष त्यांच्यावरच विसंबला व पंगू झाला, हे मी  वारंवार म्हणत आलो आहे. परंतु  तरीही या घराण्याने पक्ष व देशासाठी केलेला त्याग विसरून चालणार नाही. काँग्रेससाठी या घराण्याने अपार मेहनत घेतलेली आहे. लोकशाही मार्गाने नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांना ‘राजेशाही’वाले असे कसे म्हणता येईल? इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीचा माझ्यासह असंख्य लोकांनी धिक्कार केला आहे. परंतु म्हणून त्यांचे थोरपण कमी होत नाही. जनसंघ अस्तित्वात असताना १९६९ ते ७१  मध्ये वाजपेयी अध्यक्ष होते. १९७३ पासून ते जनता पक्ष अस्तित्वात येईपर्यंत अडवाणी अध्यक्ष होते. जनसंघाचे रूपांतर भाजपमध्ये झाल्यावर १९८० ते ८६ पुन्हा वाजपेयी अध्यक्ष झाले. तर १९८६ ते ९१, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात अडवाणी चे अध्यक्ष होते. बाकीचे अध्यक्ष वाजपेयी-अडवाणी यांनीच विचार करून निश्चित केले. मग जनसंघ व भाजपमध्ये दीर्घकाळ वाजपेयी अडवाणी यांची राजेशाही होती असे म्हणणे योग्य होईल का? या दोन नेत्यांनीही जनसंघ व भाजपासाठी प्रचंड कष्ट घेतले. अन्य अनेक नेत्यांनीही घेतले आणि मोदी शहादेखील घेत आहेत. तेव्हा आज मोदी-शहा यांची राजेशाही आहे असे म्हणायचे का? वास्तविक या दोघांखेरीज पक्षात इतरांना फारसे महत्त्व नाही. तरीही आपण त्यांची राजेशाही असल्याचे म्हणत नाही. फक्त नेहरू-गांधी घराण्यावर अनेकांचा राग असतो. त्या रागाचे रूपांतर द्वेषात होऊनही कित्येक वर्षे लोटली. काही विशिष्ट विचारांच्या लोकांच्या डोक्यात हा द्वेष इतक्या ठासून भरला आहे की, त्यांच्या वागण्याबोलण्यातून सतत आग ओकली जात असते. फुत्कार सोडले जात असतात. ये आग कब बुझेगी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *