@दिवाकर शेजवळ

राजाभाऊ ढाले हे गेल्या आठवड्यात काळाच्या पडद्याआड गेले.1977 सालातील दलित पँथरच्या बरखास्तीनंतरही 1990 च्या दशकाच्या अखेरपर्यंत ते बऱ्यापैकी कार्यरत होते. त्या कालखंडात ‘मास मूव्हमेंट’ आणि ‘सम्यक क्रांती’ अशा दोन संघटनांचे भिन्न टप्प्यात नेतृत्व करून त्यांची वाटचाल भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्ष पदापर्यंत झाली होती.

दरम्यानच्या काळात रिडल्स प्रकरणातील आंबेडकरी समाजाच्या एकजुटीच्या आंदोलनात वैचारिक आघाडीवर ढाले यांनी दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या साथीने विरोधकांना नामोहरम करून टाकले होते. राज्य सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अप्रकाशित साहित्यातील रिडल्स इन हिंदुइझम या चौथ्या खंडातील ‘राम आणि कृष्णाचे कोडे’ या एका प्रकरणावरून तो वाद उभा केला गेला होता. ते प्रकरण त्या ग्रंथातून काढून टाकावे, अशीच विरोधकांची मागणी होती. मोर्चे आणि प्रतिमोर्चानंतर दोन्ही तटांनी सामंजस्य दाखवल्यामुळे अखेर तो वाद शमला होता. ग्रंथातून ते प्रकरण वगळण्याऐवजी ‘सरकार यातील मजकुराशी सहमत असेलच असे नाही’ अशी  तळटीप टाकून तो वाद मिटवण्यात आला होता.

त्याआधी या प्रकरणात मुंबई मराठी पत्रकार संघाने रिडल्स समर्थक आणि विरोधक यांना एका परिसंवादात एकत्र आणले होते. भाजप नेते प्रा. राम कापसे, शिवसेना नेते प्रमोद नवलकर, मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार आणि राजा ढाले हे त्यात वक्ते होते. राजाभाऊंनी तिथे बंगाली रामायणापासून अनेक दाखले देत रिडल्स विरोधकांचे सारे मुद्दे निकालात काढले होते. अखेर, त्या ग्रंथातून वादग्रस्त परिशिष्ट वगळू नये, यावर सर्व वक्त्यांचे एकमत झाले होते. अन दुसऱ्या दिवशी इंग्रजी वृत्तपत्रांतील त्या परिसंवादाच्या बातमीचा मथळा होता:
RETENTION OF RIDDLES FAVOURED!
म्हणजे परिशिष्ट कायम ठेवण्यावर एकमत!
त्या परिसंवादाला मी स्वतः त्यावेळी इंडियन एक्सप्रेस मध्ये असलेले ज्येष्ठ पत्रकार रक्षित सोनावणे यांच्यासोबत उपस्थित होतो.
राजा ढाले हे भाषाप्रभु होते. अलौकिक प्रतिभेचे ते धनी होते. पँथरच्या काळात मोर्चामध्ये दिल्या जाणाऱ्या अनेक घोषणांचे ते जनक होते.
माणसं मारा
गाईला तारा
मानवतेचा ढोंगी नारा

आला शरद, गेला वसंत
जातीयतेचा होईना अंत

अशा घोषणा पँथर काळात देणाऱ्या ढाले यांनी  रिडल्स आंदोलनासाठो तयार केलेली एक घोषणा होती;

अरे गाळा, वगळा, ते परिशिष्ट
गातात सारे हिंदुत्वनिष्ठ
ते तर शिष्ट, पोथीनिष्ठ

अफलातून घोषणा आंदोलनाला बहाल करणारे राजा ढाले यांची धारदार भाषा विरोधकांना घायाळ करणारी होती. त्याचे प्रत्यंतर मोर्चे, सभा, संमेलने, परिसंवाद यातून घडायचे.

निर्वाणानंतर राजाभाऊंच्या अनेक आठवणी त्यांच्या समकालीन सहकारी नेत्यांनी, साहित्यिकांनी वृत्तपत्रांतून जागवल्या आहेत. माझे मित्र, साहित्य समीक्षक मोतीराम कटारे यांनी तर राजाभाऊ ढाले यांच्यावर एक पुस्तिकाच लिहिण्याचा संकल्प जाहीर केला आहे. ढाले यांच्या अंत्ययात्रेत 1994 साली झालेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर जन्मलेली तरुण दलित पिढी दिसली नाही. त्या पिढीला दलित पँथर आणि राजा ढाले यांचे योगदान, इतिहास समजणे गरजेचे आहे. कटारे यांच्या पुस्तिकेतून ती गरज पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. दलित पँथरच्या पाच सहा वर्षे आधी स्थापन झालेली शिवसेना तब्बल दोन दशकांनी मुंबई ठाण्याबाहेर पडली होती. पण असंख्य स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ता मिळवत उशिरा का होईना राज्यात सत्ताधारी बनली. मग स्थापनेपासूनच राज्यभरात पोहोचलेल्या पँथरबाबत तसे का घडले नाही? याचा शोध घेणे पँथरच्या इतिहासाला उजाळा देण्याइतकेच  महत्वाचे आहे.
क्रमशः………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *