@दिवाकर शेजवळ

एक होता राजा‘…
भाग: दुसरा

राजाभाऊ ढाले यांनी दलित पँथरच्या झंजावातात स्वतःला झोकून दिल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, राखीव जागा बचाव आंदोलन, रिडल्स आंदोलन आणि फसलेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या प्रयोगांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र राजकारणापेक्षा त्यांना धम्माची ओढ अधिक होती. तसंच फुले-आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्याच्या निर्मितीवर त्यांचा भर होता. त्यामुळे राजकारण आणि आंदोलनांपेक्षा ते धम्म परिषदा आणि साहित्य संमेलनं, वैचारिक परिसंवाद,चर्चासत्रात अधिक रमायचे.

प्रस्थापित साहित्याविरोधातील विद्रोही दलित साहित्याचे बंड आणि दलित पँथरच्या उद्रेकात राजाभाऊ हे ‘अँग्री यंग मॅन’ ठरले होते. पण पँथरच्या बरखास्तीनंतर मात्र त्यांनी ‘दलित’ शब्द नाकारण्याची आणि विद्रोही साहित्याला फुले-आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य संबोधण्याची भूमिका घेतली होती. असं असतानाही आंबेडकरी जनतेने त्यांना निर्वाणानंतर ‘दलित पँथरचा महानायक’ म्हणूनच अखेरचा निरोप दिला. अन ते सर्वार्थाने योग्यच होते. कारण राजा ढाले-नामदेव ढसाळ यांची 1972 ची दलित पँथर भलेही दुर्दैवाने अल्पजीवी ठरली असली तरी तेवढ्या कालखंडातही तिने घडवलेला इतिहास मोठा ठरला. तो इतिहास होता 1970 च्या दशकात दलितांवर वाढलेल्या हिंसक अत्याचारांविरोधात चढाईचा आणि खुलेआम लढाईचा.

त्या काळातील अत्याचाराची पुनरावृत्ती घडत असल्याचे चित्र देशात दिसू लागल्यावर दलित समाजातून आजही ‘पँथर’चा धावा केला जातो. पँथरच्या त्या ऐतिहासिक संचितामुळे ढाले यांनी पँथरच्या बरखास्तीनंतर घेतलेल्या वेगळ्या भूमिका आणि नेतृत्त्व केलेल्या संघटना विस्मृतीत गेल्या. राजाभाऊ महानायक म्हणूनच पँथरच्या इतिहासात नोंदवले गेले.

पँथरचा संस्थापक कोण, यावर वृत्तपत्रांनी अनेकदा मुलाखती आणि लेखमाला चालवून वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न केला. पण स्वातंत्र्य दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील ‘साधना’ साप्ताहिकात लिहिलेल्या ‘काळा स्वातंत्र्य दिन’ या लेखाने ढाले यांना पँथरचा सुप्रीमो बनवून टाकले होते. मग त्या संघटनेची, स्थापनेची बैठक कधी कुठे झाली, त्यावेळी कोण कोण हजर होते, स्थापनेच्या घोषणेचे पत्रक कोणी काढले हे सारे मुद्दे पँथरच्या झंजावातात वाहून गेले होते.

आधी राजा, मग बाकी सगळे असे समीकरण प्रस्थापित झाले होते. पँथरच्या ‘पंचक’ नेत्यांचा क्रम राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वि पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर असा होता. त्यातील प्रत्येक मोहरा ताकदीचा होता हे सर्वश्रुत आहे. तरीही ढाले आणि ढसाळ हेच त्या पँथरचा ‘चेहरा मोहरा’ ठरले होते.

त्या काळात पँथर्स नेते आणि कार्यकर्त्यांची ओळख म्हणजे झब्बा, बेलबोटम आणि खांद्यावर शबनम बॅग म्हणजे झोळी ही होती. पण पँथरच्या ढाले, ढसाळ, ज वि, संगारे, महातेकर यांची झोळी राजकारणात मात्र कायम रितीच राहिली. (महातेकर यांना आता मिळालेले राज्यमंत्री पद हे रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील पँथरच्या दुसऱ्या अध्यायातील राजकारणाची फलश्रुती आहे. त्यात आतापर्यंत आठवले यांच्यासह पाच पँथर्सना सत्तेचा लाभ मिळाला आहे.) 1972 च्या पँथरमधील पहिले पाचही नेते हे राजकारणासाठीचे ‘प्रॉडक्ट’ नव्हतेच, ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल.

वरळीच्या पोट निवडणुकीवर पँथर नेत्यांनी  टाकलेला दलितांचा बहिष्कार ही त्यांच्या राजकीय भाबडेपणाची नांदीच ठरली. त्यांनतर पाचपैकी कोणीही पँथर नेता राजकारणात यशस्वी होऊ शकला नाही. वरळीची पोट निवडणूक त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला असता तर दलितांचे राजकीय उपद्रवमूल्य सिद्ध होऊन त्याची नोंद झाली असती. मग पुढच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी पँथर नेत्यांच्या पायाशी लोळण घेतली असती. पण राजकीय चाणाक्षपणाच्या अभावामुळे ते घडू शकले नव्हते.

पँथर्सची स्थापना 1972 ची. तर, शिवसेनेची स्थापना 1966 म्हणजे केवळ त्याआधी सहा वर्षांपूर्वीची. त्यातच पँथर ही स्थापनेपासूनच राज्यभर पोहोचलेली. तर, शिवसेना ही स्थापनेनंतर दोन दशकांनी ठाण्याबाहेर पडली होती. पण शिवसेना ही आज राज्यात आणि केंद्रातही सत्तेवर पोहोचली आहे. तर, पँथरची मात्र नेत्यांमधील मतभेदांमुळे पाच वर्षांतच शकले उडाली होती. दलित पँथरला स्वाभाविकपणे कोणी वाढू दिले नाही हे अर्जुन डांगळे यांचं म्हणणं खरं आहे. त्या संघटनेला अंकित करण्यासाठी, आपल्या कह्यात ठेवण्यासाठी कम्युनिस्ट, समाजवादी, काँग्रेस अशा सर्वच पक्षात अहमहमिका लागली होती. त्यांच्यातील चढाओढीचा पँथरवर व्हायचा तो परिणाम झाला. ती स्वतंत्रपणे वाढू शकली नाही. राजकारणात तिला ‘ब्रेक’ लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *