उन्नाव बलात्कार पीडित परिवाराने मुख्य न्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायालयात म्हटलं की, मी वर्तमानपत्रांमध्ये पीडित परिवाराने पत्र लिहिलं आहे, असं वाचलं. माझ्याजवळ हे पत्र मंगळवारी आलं. मी अजून ते बघितलं नाही आहे. सर्वोच्च न्यायालय यावर उद्या सुनावणी करेल. तसंच, उन्नाव बलात्कार पीडित परिवाराने लिहिलेल्या पत्राला माझ्यासमोर यायला उशीर का झाला, असा जाब मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालय रजिस्ट्रीला विचारला आहे.

उन्नाव बलात्कार पीडित कार अपघातात गंभीर जखमी आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या परिवाराने मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहून आरोपी कुलदीप सेंगर कडून धमकी येत असल्याचं आणि जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी पीडित परिवाराने लिहिलेलं पत्र मुख्य न्यायाधीश यांच्या कार्यालयात मिळाल्याचं सांगितलं. मुख्य न्यायाधीशांनी सरचिटणीसांना पत्राच्या आधारावर टीप तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बलात्कार पीडित आणि तिच्या परिवारातील दोघांनी १२ जुलैला पत्र लिहिलं. हे पत्र अलाहाबाद उच्च न्यायालय आणि उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना पाठवलं होतं.

उन्नाव बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेशमधील भाजपचे चार वेळचे आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहेत. कुलदीप सेंगरला २०१८ मध्ये पक्षातून निलंबित केलं, असा दावा उत्तर प्रदेश भाजपने केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *