नाचू कीर्तनाच्या रंगी |
ज्ञानदीप लावू जगी |

नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तन परंपरा सुरू केली. ही कीर्तन परंपरा सुरू करण्यामागील आपला उद्देश नामदेव महाराजांनी वरील अभंगात स्पष्ट केला आहे.

चला चला पंढरीला
भेदभाव विसराया
संतांचीया चरणी माथा टेकवाया
चंद्रभागे तीरी नवे कीर्तन पेराया

लोकशाहीर संभाजी भगत, शाहीर शीतल साठे, सचिन माळी यांनी वारी निमित्त गायलेलं  हे नवं  गाणं आहे. एक दिवस तरी वारी अनुभवण्यासाठी  एकत्र  आलेल्या मंडळी साठी तुकोबारायांच्या पालखी मध्ये का आणि कशासाठी चालायचं आहे याचा उद्देश नामदेव महाराजांच्या या अभंगातून आणि संभाजी भगत यांच्या गाण्यातून व्यक्त होत होता.

गेली चार पाच वर्षे ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात चालल्या नंतर यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात चालण्याचा निर्णय महाराष्ट्रातील विविध पुरोगामी संस्था, संघटनांनी घेतला.

यवत ते वरवंड या टप्प्यात ३० जून २०१९ रोजी आदरणीय मोहनभाऊ लवांडे यांच्या श्री काल भैरवनाथ प्रासादिक दिंडी, हिंगणगाव (शिंदे वाडी) दिंडी क्रमांक 115 मध्ये सामील होण्यासाठी आम्ही समतेचे वारकरी निघालो. पहाटे 6 वाजता पुण्याच्या साने गुरुजी स्मारकावरुन राष्ट्र सेवा दलाचे  दत्ता पाकिरे, साधना शिंदे, पुष्पा क्षीरसागर, भगवान कोकणे, प्रकाश कदम आणि साथी 50 जणांची बस घेऊन यवतच्या दिशेने निघाले. तर  एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन मध्ये नितीन मते सोबत महाराष्ट्र युवा परिषदेची 35 तरुण मुलामुलींची टीम आणि मुंबई ठाण्याहून महादेव पाटील, समीर भोसले, सुहास कोते, अंनिसच्या वंदना शिंदे, सुरेखा देशमुख, गणेश क्षीरसागर, राजू भिसे, रजनी सावंत, नम्रता जाधव, सुदाम वाघमारे यांच्या सोबत आलेले 50 जण हडपसर, लोणी मार्गाने यवत कडे निघाले. मुंबईच्या बस मध्ये कार्यकर्त्या सोबत नव्याने सामील झालेले जयंत घाडगे, प्रदीप मयेकर, प्रमोद घाग, कुसूम सावंत, शरद नाईक, पुष्पा येरावर, मंगला गवळी, अजय काळे, सुधीर कोसके, सुषमा पोखरकर, विशाल जाधव, ज्योती घाग, चारुशीला केसरकर, अशोक सडेकर पवार  आदी सामील झाले होते. येवल्याहुन अर्जुन कोकाटे 20 जणांची टीम घेऊन सामील झाले.

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सामील होत असताना यंदा  दोन महत्वाच्या घटना घडल्या. त्यातली एक, या दिंडीत ‘संत विचार’ आणि ‘संविधानातील मूल्ये’ ही परस्परपूरक आहेत हे सांगण्यासाठी ‘संविधान दिंडी’ काढण्यात आली. ही दिंडी  क्रमांक 115 सोबत चालत होती. ही संविधान दिंडी ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली  नागेश जाधव, संदीप आखाडे, निलेश खानविलकर आणि सहकार्यांच्या सोबत पंढरपूर पर्यंत जाणार आहे. दुसरी घटना, वारीत सामील होण्यापूर्वी ही दिंडी पुण्यातील ‘महात्मा जोतीबा फुले’ यांच्या वाड्यात जोतिबा आणि सावित्रीबाईंना वंदन करून निघाली. सकाळी 6 वाजता दीडशे  समतेचे वारकरी यात सामील झाले होते.

या दोन घटनांनी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमाची दिशा स्पष्ट होत होती.

निवृत्त आय पी एस अधिकारी सुरेश खोपडे, ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज, संविधान अभ्यासक आणि एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे सुभाष वारे, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, सामाजिक कार्यकर्ते संदेश दिवेकर, साम टीव्हीच्या पत्रकार  सोनाली शिंदे, रत्नागिरीहुन आलेले प्रहारचे पत्रकार सुनील चव्हाण, राजापूरहुन आलेले पत्रकार नरेंद्र मोहिते, संपादक सुनील क्षीरसागर, प्राचार्य सविता शेटे, नरेंद्र डुंबरे, महाराष्ट्र युवा परिषदेचे नितीन मते त्यांच्या तरुण कार्यकर्त्या सोबत सामील झाले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरिदास तम्येवार, मनोहर जायभाये, वंदना शिंदे, पुण्यातून आलेले श्रीरंजन आवटे, राही श्रुती गणेश, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढाऊ कार्यकर्त्या शर्मिला येवले, पलुस, सांगलीहुन आलेले रोहित आणि सहकारी तसेच मालेगावहुन आलेला राष्ट्र सेवा दलाचा नचिकेत कोळपकर, औरंगाबादहुन  आलेल्या सेवा दलाच्या कोमल बारहाते, सोनाली लबडे, तारा जाधव, सोनाली निकम, व्ही जे टी आय या मुंबईतील संस्थेत काम करणारे  प्रा. प्रवीण देशमुख, समता विद्या मंदिर या मुंबईतील संस्थेचे प्राचार्य कमलाकर सुभेदार,मुंबईहून राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष शरद कदम, सेवा दलाच्या कार्यकर्त्यासह सामील झाले होते. संगमनेरहुन गाथा परिवाराचे प्रा उल्हास पाटील जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंग पाठमाला घेऊन सामील झाले होते. यवतला सकाळी 8 च्या सुमारास पोहचल्या  नंतर आदरणीय मोहनभाऊ लवांडे यांच्या दिंडी क्रमांक 115 सोबत सर्वांनी चालायला सुरुवात केली.

अर्जुन कोकाटे यांनी
ज्ञानोबा तुकाराम च्या सोबतच
पानसरे तुकाराम
दाभोळकर तुकाराम
कलबुर्गी तुकाराम
असं तालासुरात गात उपस्थित वारकर्यांचे लक्ष वेधुन घेतलं.
विवेकाचा आवाज तुकाराम
विवेकाचा आवाज पानसरे
यालाही सर्वांनी साथ दिली.

पुण्याच्या शुभांगी देशमुख, साधना शिंदे मुंबईच्या नम्रता जाधव, रजनी सावंत इतर महिलांना घेऊन रस्त्यावर फुगड्या घालत होत्या. अकरा ते बारा किलोमीटर अंतर चालल्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास  चौफुलाच्या अलीकडे दिंडीसोबत जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. खूप चालल्यामुळे भुका ही लागल्या होत्या. जमिनीवर पंगत बसून गरमा गरम भाकरी, पिठलं आणि भात याचा छान बेत आखला होता. जेवण झाल्यावर पुन्हा तिथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरमलनाथ देवस्थान येथे  हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांचे

नामदेवे केली आखणी, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस यावर दीड तास प्रवचन झालं.
शांत परिसर, पावसाची रिपरिप या मध्ये सोन्नर महाराजांचा छान सूर लागला होता. इथल्या व्यवस्थेसाठी स्थानिक सेवा दल कार्यकर्ते संदेश दिवेकर आणि बोरमलनाथ देवस्थानाचे कैलास आबा शेलार यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले.

राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे यांनी पुढाकार घेऊन चार वर्षांपासून महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील नामवंतांना घेऊन वारीत सामील  होण्याची कल्पना मांडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष  अल्लाउद्दीन शेख, महाराष्ट्र युवा परिषदेचे नितीन मते, लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे यांनी सक्रीय सहभाग दिला. त्यामुळेच याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. यात काही गोष्टी ठरविण्यात आल्या आहेत त्या अशा की, आपण यात प्रबोधन  किंवा काही शिकवायला तिथे जात नाही तर आपण शिकायला जात आहोत. या संत परंपरेशी आपलं 700 वर्षा पासून नाते आहे. ते पुन्हा अधिक संवादी करण्यासाठी आपण जात आहोत.

श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी आपल्या प्रवचनात, वरील सर्व संस्था ज्या विचाराने काम करत आहेत त्याची बीजे 700 वर्षापूर्वी संत परंपरेत कशी आहेत ते अनेक अभंग आणि संतांच्या कृतीतुन उलगडून दाखविले. सुभाष वारे यांनी  सांगितले की आपण सर्वजण केवळ रणनितीचा भाग म्हणुन या वारीत सामील होत नसुन संतविचारांचा वारसा हा मानवतावादी व विवेकी विचारांचाच वारसा आहे हे मनोमन जाणुन सामान्य वारकऱ्र्याच्या भुमिकेतून वारीत सामील होत आहोत. हे नाते एक दिवसाच्या वारीपुरते न राहता आपापल्या गावातील वारकर्यांसोबत, भजनी मंडळा सोबत संवादी नाते जोडण्याची प्रक्रिया आपण सुरु केली आहे. ती आणखी खोलवर नेऊया. मुळ संतविचार जो निरर्थक कर्मकांडांच्या  आणि जन्माधिष्ठीत उच्च निचतेच्या  विरोधातील विद्रोही हुंकार आहे तो त्याच मुळ रुपात समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण सतत आणि नम्र भावनेने करत राहिले पाहिजे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित उद्याच्या भारताचे स्वप्न आपण भारतीयांनी संविधानाच्या माध्यमातून स्वीकारलं आहे. राज्य व्यवस्थेने आणि नागरिकांनी संविधानाला प्रमाण मानून व्यवहार करणे अपेक्षित आहे. संत परंपरेचा उदार मानवतावादी विचार आणि संविधानाला अपेक्षित स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार हा एकाच परंपरेचा भाग आहे असं आम्ही मानतो, असं राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम यांनी मांडलं.

आज भारतीय समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न, समस्या आ वासून उभ्या आहेत कारण संविधानाच्या स्वप्नाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. त्याच बरोबर सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना साध्या सरळ उपासनेच्या मार्गाने एकत्र बांधून ठेवू शकणाऱ्या संत विचारांना ही आपण नीट समजून घेऊ शकलेलो नाहीत असे दिसतंय. हा संत विचार सामूहिकरित्या नीट समजून घ्यावा. त्याचे संविधाना बरोबर नातेही समजून घ्यावे आणि सामूहिकरित्या त्या शिकवणीशी कृतिशील  नाते जोडावे अशा नम्र भावनेने या वारीत सामील होत रहायचे अशी सामुहिक भावना अनेकांनी व्यक्त करून पुढच्या वर्षी नव्या मित्र मैत्रिणीसह सामील होण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *