
राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवेश कोटा असतो. मात्र या कोट्यात एचआर, जयहिंद आणि केसी महाविद्यालयांसह इतर नामांकित महाविद्यालयांमध्ये घोटाळा केला जात असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. एचआर महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ही ९०० विद्यार्थ्यांची आहे. तर जयहिंद मध्ये १२०० आणि केसी महाविद्यालयात १३५० एवढी क्षमता आहे. मात्र या महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांक कोट्यातील केवळ ५% ते १०% प्रवेश होतो. उर्वरित ४० ते ४५ टक्के प्रवेश हे आर्थिक देवाणघेवाण करून होतात, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
शासनाची दिशाभूल करून अल्पसंख्यांकांच्या राखीव जागेवर आर्थिक व्यवहार करून प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर आणि शिक्षण उपसंचालकांवर गुन्हा दाखल करावा. तसंच संबंधित महाविद्यालयांचा अल्पसंख्यांक दर्जा काढून घेण्यात यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. यावर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी या घोटाळ्यावर केस टू केस चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच यावर्षी एकही ऑफलाइन प्रवेश होणार नाही अशी ग्वाही शेलार यांनी दिली आहे.