एक्झिट पोलची पोलखोल

अवैज्ञानिक अंदाजपंछी

एक्झिट पोल्स
अनेक संस्थांनी एक्झिट पोल्स प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या निकालानुसार नरेंद्र मोदी अर्थात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होणार आहे.
एक्झिट पोल्स संबंधातील माझी भूमिका–
1. मतदान– मतपत्रिका हा डेटा नसतो. इव्हीएम मधील मतं हा डेटा असतो. डेटा एका यंत्रातून वा दुसर्‍या यंत्रामध्ये भरणं, त्यावर प्रक्रिया करणं, त्याच्यामध्ये बदल करणं या सर्व बाबी प्रकाशाच्या वेगाने करता येतात.
मतपत्रिका होत्या त्यावेळी मतदान केंद्र जबरदस्तीने ताब्यात घेतली जायची, त्यासाठी बाहुबलाचा अर्थात गुंडांचा उपयोग केला जायचा. परंतु ही सर्व प्रक्रिया विकेंद्रीत होती. ज्या मतदान केंद्राच्या परिसरात एका विशिष्ट राजकीय पक्षाचं संघटन वा जोर आहे ते मतदान केंद्र दुसर्‍या राजकीय पक्षाला ताब्यात घेता येणं अवघड होतं.
ईव्हीएम मुळे डेटा हॅक करणं केंद्रीय पद्धतीने होऊ शकतं.
2. एक्झिट पोल्सनी नमुना पाहाणी किती मतदारसंघात केली, किती मतदान केंद्रांवर केली, नमुने कसे निवडले, त्यांना काय प्रश्न विचारले, थोडक्यात नमुना पाहाणीची पद्धत काय होती?
यासंबंधात फारशी माहिती नाही. त्यावर चर्चा नाही.
3. आदर्श बाजारपेठेची व्याख्या आडाम स्मिथने पुढीलप्रमाणे केली होती– बाजारपेठेत कोणत्या वस्तू आहेत, त्यांचे उपयोग, किंमत आणि मूल्य काय आहे ह्याची माहिती प्रत्येक ग्राहकाला असते आणि प्रत्येक ग्राहकाच्या गरजा काय आहेत, याची माहिती प्रत्येक उत्पादकाला असते.
ही आदर्श बाजारपेठ माहितीतंत्रज्ञानातील क्रांतीमुळे निर्माण झाली आहे असं बिल गेटसने रोड अहेड या त्याच्या ग्रंथात म्हटलं आहे. अर्थात त्यानुसार काहीही घडलं नाही. परंतु मुद्दा असा की गुगुल वा फेसबुकवर प्रोफाईल निर्माण करणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, विचार, कल, व्यक्तीमत्व इत्यादी सर्व डेटा गुगुलकडे निर्माण होतो. हा डेटा विकता येतो, या डेटानुसार प्रत्येक व्यक्तीला मेसेज– जाहिरात, प्रचार, विचार– लेख, चित्र, दृकश्राव्य क्लिप्स इत्यादी पाठवाता येऊ शकतात. या मार्गाने उत्पादक वा भांडवलदार प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रवेश करतात.  त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचीही माहिती तिच्या प्रोफाईलवरून मिळता येते. त्याआधारे त्यांनाही मेसेज पाठवता येऊ शकतात. प्रत्येकाच्या आवड, नावड, निवड याची माहिती गुगुल वा अन्य कोणत्याही प्रोफाईलद्वारे मिळवता येते. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र मेसेज तयार करता येतो.
4.  नवीन टेक्नॉलॉजी आणि लोकशाही हातात हात घालून जात नाहीत. कारण माणसांना प्रभावित करण्याचे विविध मार्ग नवीन टेक्नॉलॉजीने उपलब्ध करून दिले आहेत. नवीन तंत्रज्ञानाची जडण-घडण, शोध इंजिनीयर्स, शास्त्रज्ञ आणि भांडवलदार करतात. त्यांना उदारमतवाद, लोकशाही इत्यादी मूल्यांशी फारसं देणंघेणं नसतं. त्यांना त्यांचा संबंध त्यांचे पगार, मानधन आणि नफा यांच्याशी असतो.
उदारमतवादी लोकशाहीच्या मूल्यांच्या गळ्याला नख लावणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर ते करतात.
5. अमेरिका, ब्रिटन (ब्रेक्झिट), तुर्कस्तान, रशिया, चीन, इस्त्रायल, मध्य-पूर्वेतील इस्लामी राष्ट्रे इत्यादी सर्व राष्ट्रांमध्ये अर्वाचीन (अमेरिका आणि इंग्लड) आणि प्राचीन भूतकाळाला आवाहन करून मतदारांना आकर्षित केलं जातं. भारत हा अपवाद नाही.
6. उदारमतवादी लोकशाही वाफेच्या इंजिनांचं (औद्योगिक क्रांती) अपत्य आहे. तेलशुद्धिकरण कारखाने इत्यादी अनेक शोध व संशोधनांना त्यामुळे गती मिळाली. मुक्त व्यापार, मुक्त बाजारपेठ, मुक्त निवडणुका, मानवी हक्क, विविधता हे उदारमतवादी लोकशाहीचं  पॅकेज आहे. फॅसिझम, कम्युनिझम यांच्या आव्हानांना उदारमतवादी लोकशाही पुरून उरली. परंतु नव्या माहितीतंत्रज्ञान क्रांतीपुढे ती गुडघे टेकेल अशी शक्यता दिसते.
7.  उदारमतवादी लोकशाहीचं मॉडेल तंत्रज्ञान क्रांतीमुळे धोक्यात आलं आहे. कारण मत मॅनिप्युलेट करण्याची तंत्रज्ञानाची शक्ती कित्येक पटींनी वाढली आहे. मुसोलिनी वा हिटलर वा स्टालीन वा माओ यांच्या काळात ही शक्ती अर्थात तंत्रज्ञान नव्हतं.
8. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची राजवट आहे. या राजवटीला मुक्त व्यापार, मुक्त बाजारपेठा हव्या आहेत पण मुक्त निवडणुका नको आहेत.
9. डोनाल्ड ट्रंम्प यांना मुक्त बाजारपेठ हवी आहे पण मुक्त व्यापाराला त्यांचा विरोध आहे.
10. भाजपला मुक्त व्यापार, मुक्त बाजारपेठ हवी आहे परंतु विविधता, मानवी हक्क यांची गरज वाटत नाही.
11. अशी परिस्थिती सर्वत्र दिसते. उदारमतवादी लोकशाही आपले प्रश्न सोडवू शकत नाही अशी धारणा सर्व जगात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजप यांना वाढता पाठिंबा दिसतो. शेतकर्‍यांची आंदोलन, गोधन आणि गोराक्षसांचा धुमाकूळ, नोटाबंदी, जीएसटी इत्यादी कोणत्याही प्रश्नापेक्षा वांशिक, धार्मिक, जातीची अस्मिता, राष्ट्रवाद, पाकिस्तानला धडा शिकवणं इत्यादी विषयांना त्यामुळेच प्राधान्य मिळतं.
एकंदरीत परिस्थिती  अतिशय बिकट आहे. तरिही आपण 23 मे रोजी जाहीर होणार्‍या अधिकृत निवडणुक निकालांची वाट पाहूया.
— सुनील तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *