तर नोटांवर जय मातादी लिहलेलं असेल

दिनांक 21 मे रोजी झी 24 तास वर झालेली चर्चा म्हणजे भारताला हजार वर्ष मागे नेवून अश्मयुगात टाकण्याची सुरुवात झालीय असेच समजावे लागेल. या अशा कृतीने आपण भारताला महासत्ता होण्याचं कोणतं स्वप्न दाखवतोय? आपण कोणत्या अर्थाने याला बुद्ध, शिवराय, ज्योतिराव फुले आणि डॉ.आंबेडकर यांचा देश म्हणतोय? असा प्रश्न पडू लागलाय. मुळात ही झी 24 तास वाहिनी भाजप चे खासदार उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या मालकीची आहे. या झी 24 तास वाहिनीवर रोजच्या प्रमाणे चर्चासत्र सुरू होते. या चर्चासत्राचा विषय होता “आगामी काळात देशाची आर्थिक स्थिती कशी असेल?” यावेळेस या आर्थिक विषयावर बोलायला एखादा अर्थतज्ञ येईल असे ना पाहता वाहिनीने या देशाच्या आर्थिक स्थितीवर बोलायला बसवले कोणाला तर दोन कुंडल्या बनवणारे, एक ज्योतिषी तर चौथा प्राचीन विद्या संशोधक यांना. ज्यांना प्राचीन भारतात सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य ज्यांनी कुंडल्या न बघता भारताचा विस्तार आशिया खंडात पसरवला याची माहिती नाहीं. यांना छत्रपती शिवराय आणि शंभूराजे माहिती नाहीत ज्यांनी कधीही मुहूर्त आणि सत्यनारायण न घालता आपल्या सर्व लढाया अंधाऱ्या रात्रीच लढल्या आणि मराठा साम्राज्याचा विस्तार भारतभर पसरवला याचा काडीचाही गंध नाहीं.
रिझर्व बँकेच्या दोन उर्जित पटेल आणि रघुराम राजन या संचालकांनी राजीनामा दिलेला आहे आणि सध्या त्यांच्या जागेवर नियुक्त असलेले शक्तिकांता दास ज्यांचे मूळ शिक्षणचं अर्थशास्त्रात न होता इतिहासात एम. ए. पर्यंत झालेले आहे. हास्यास्पद गोष्ट म्हणजे अशा या इतिहासातील एम.ए असणाऱ्या शक्तिकांता दास यांच्या निवड समितीत नरेंद्र मोदी, अरुण जेटली यांच्या सोबत स्वतः सुभाष चंद्रा हेही होते. असो आजचा हा मुद्दा नाहीय तर भाजप पुरस्कृत झी 24 तास या वाहिनीला आगामी काळात भारताची आर्थिक परस्थिती या विषयावर बोलण्यासाठी एखाद्या अर्थतज्ञाला बोलावावेसे वाटले नाहीं. कारण भारताची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि देशाचे सोने गहाण ठेवणाऱ्या भाजप सरकार बद्दल एखादा अभ्यासू अर्थतज्ञ काय बोलेल याची भीती असावी किंवा भारताची ढासळलेली आर्थिक स्थिती आतां एखादा गल्लोगली “भविष्य सांगणार, कुंडली बघणार ” असे ओरडणारा ज्योतिषीच सुधारू शकतो अशी भाबडी आशा निर्माण झालेली असणार. परंतू झाल्या याप्रकारामुळे भारताची भविष्यातील वाटचाल कुठे जातेय याचा विचार करून डोकं सुन्न होतंय. ही अशीच परिस्थिती राहिली तर उद्या आपण वापरत असलेल्या चलनी नोटांवर एखाद्या कुडमुड्या ज्योतिषाचा अंगठा असेल आणि त्यावर सत्यमेव जयते ऐवजी “जय मातादी” लिहलेले असेल.
हा विनोद नसून असं व्हायला पुरेपूर वाव आहे. कारण वर्णव्यवस्था अबाधित ठेवणं हाच संघाचा छुपा अजेन्डा असल्याचे आतां गुपीत राहिलेले नाहीय. हे ह्या संघाच्या अनेक व्यक्तींनी अनेकवेळा आपल्या साहित्यातून आणि मुखातून व्यक्त केलेले आहे. संघाला ही वर्ण व्यवस्था अबाधित ठेवायची आहे तर त्यासाठी वर्णव्यवस्थेतेतील खालील तीनही स्थरावर असणाऱ्या वर्णांना शिक्षण, विज्ञान आणि आर्थिक उन्नती पासून कोसोदूर ठेवून धर्मवाद, अंधश्रद्धा आणि मूळ गरजा ज्यात अन्न, वस्त्र, निवारा, पाणी यांच्यात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे हे पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून असे होताना दिसत आहे, देशात वाढत चाललेली बेरोजगारी आणि जे रोजगारावर आहेत त्यांना 12 ते 14 तास कामाचा त्राण आणि त्यातून सतत तेवत ठेवलेली असुरक्षित असल्याची भावना, एका बाजूला पाण्याचा दुष्काळ पसरलेला आणि प्यायला सुद्धा पाणी नसणं आणि आणि दुसरीकडे शेकडो लिटर पाण्यात सुरू असलेले बाथटब, यातून सतत वर्ग संघर्ष सतत पेटत ठेवायचा. तसेच देव, गाय, प्राचीन परंपरा, मंदिर आणि मशीद या मुद्द्यावर सतत गुंतवून ठेवायचं. आणि धर्म खतरे में है च्या घोषणांखाली तरुणांना दहशतवादाकडे घेऊन जायचं आणि दुसरीकडे आपणच दहशतवादावर सतत चर्चा घडवून दहशतवादाची भीती कशी जनमानसात राहील अशी आखणी करायची. मग अशा प्रश्नात खालील तीनही वर्णांना गुंतवून त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी बुवाबाजी, वास्तुशांती, पूजा, अर्चना, बळी, ज्योतिषी, कुंडल्या हेच मार्ग असल्याचे दाखवत राहायचे. पुढे हे सर्व मार्ग आपल्याच हातात आहेत हे दर्शवून या तीनही वर्णांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत ठेवायचं. अशाने आपोआपच संविधानाने मातीत गाडलेली वर्णव्यवस्था अबाधित राहील हा उद्देश साध्य होइल. या आपल्या उद्देशाच्या आड येताना कोणी दिसत असेल तर त्याला संपवायचं मग तो कोणीही असला तरी असला तरी चालेल. अगदी आपला वरच्या थरावर असलेला तरी चालेल. हेमंत करकरे, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हे या वर्णव्यवस्था अबाधित ठेवण्याचे अडथळे ठरले आणि बळी गेलेत यात काहीही शंका नाहीं. अगदी सतत आरक्षणाच्या नावाने टाहो फोडत संविधानाच्या विरोधात या तीनही वर्णांची एकमेकांच्या विरोधात माथी भडकावणे हाही यातलाच भाग आहे.
मी सांगत असलेले सत्य ज्या कोणाला पटत नसेल तर नसूदे. ज्यांना आगामी काळात भारताची आर्थिक स्थिती कशी असेल हे झी 24 तास प्रमाणेच कुंडली बहाद्दर ज्योतिषी सांगू आणि सुधारू शकतील असे वाटत असेल अशांनी त्यांच्या पाल्यांनी शाळेत विज्ञान आणि भूगोल ह्या विषयाचा अभ्यास करूच नये असे काहीतरी करावे किंवा आपल्या पाल्याला विज्ञान आणि भूगोल शिकवल्या जाणाऱ्या शाळेतून काढून एखाद्या ज्योतिषाकडे शिक्षणाला पाठवावे. तसेही संघाने जागो जागी स्थापन केलेल्या वेद शाळांमध्ये तुमच्या पाल्यांना प्रवेश मिळणार नाहींच. नविन वर्ण व्यवस्थेतेतही तुमच्या पाल्यांना पॉट मेकिंग, हॉटेल मॅनेजमेंट, हाऊसकिपींग, मॅकेनिक, ऑफिस बॉय आणि टेलरिंग या इंग्रजी नावाखाली वरील वर्णाची सेवाच करायची आहे.
सरते शेवटी ज्योतिराव फुले यांच्या समग्र वाङमयातील जनाचे श्लोक मधील काही ओळी मुद्दामहून देतो आहे, यावरून आपण सहज समजू शकतो कि ही सनातनी पिलावळ ज्योतिराव फुले यांचा इतका द्वेष आजही का करते आहे.
कल्पनेचे देव कोरिले उदंड | रचिलें पाखंड | हितासाठी ||
किन्नर गंधर्व ग्रंथी नाचवीले | अज्ञ फसवीले | कृत्रिमाने ||
निर्लज्य सोवळे त्यांचे अधिष्ठान | भोंदीती निदान | शूद्रादीक ||
ब्राम्हणांनी नित्य होऊनी निःसंग | शूद्र केले नंग | ज्योती म्हणे ||
– प्रमोद शिंदे
9967013336