निवडणूक आयोग पक्षपाती आहे, असं रोखठोक मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडलं. राहुल गांधींनी पुढे असंही म्हटलं की, ” देशातील स्वायत्त संस्थांवर दबाव आणून त्यांच्याकडून काम करून घेण्याची पद्धत नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएस अवलंबताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालय, नियोजन आयोग, रिझर्व्ह बँक आणि निवडणूक आयोग या सगळ्यांच्या बाबतीत हे दिसून आलंय.” या मुद्द्यावर काही ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंतांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया…

विजय चोरमारे (ज्येष्ठ पत्रकार)
निवडणूक आयोगाने निवडणुक प्रचाराबाबत सुरुवातीलाच काही गाईडलाईन्स स्पष्ट केल्या होत्या. त्यात धर्माच्या, सैनिकांच्या आधारे मतं मागता येणार नाहीत हे मुद्दे होते. पण पंतप्रधान मोदी लातूरला पुलवामाच्या नावावर मतं मागतात आणि त्यावर निवडणूक आयोग त्यांना क्लिनचीट देतं. याचाच अर्थ निवडणूक आयोगाने स्वतःच तयार केलेल्या गाईडलाईन्स धाब्यावर बसविल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेवढ्या क्लिनचीट त्यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांना वाटल्या नसतील, तेवढ्या निवडणूक आयोगाने गेल्या महिनाभरात वाटल्या आहेत.

अरुण खोरे (ज्येष्ठ पत्रकार )
राहुल गांधींच्या वक्तव्याशी मी पूर्ण सहमत आहे. आपले माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं काम मी जवळून पाहिलं आहे. त्यावेळच्या माल प्रॅक्टिस करणाऱ्या घटकांना त्यांची जरब होती. मोदींच्या बायोपिकवर बंदी आल्यावर नमो टीव्ही बंद होईल असं वाटलं होतं. नमो टीव्हीच्या बाबतीत विविध पातळ्यांवरून विरोध झाला. मात्र निवडणूक आयोगाने फक्त बघ्याची भूमिका घेतली. हि गंभीर बाब आहे.

हेमंत देसाई (ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक)
निश्चितच निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतंय यात दुमत नाही. विविध पातळ्यांवर तक्रारी येऊनही आयोग कारवाई करीत नाही. सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला तेंव्हा निवडणूक आयोगाला जग आली. याआधी असं क्वचितच घडलंय. निवडणूक आयोगाबाबत राष्ट्रीय स्तरावर फार वाद पूर्वी झाले नव्हते. यासाठीच आयुक्तांची नेमणूक सरकारच्या हाती नसावी. त्यामुळे त्यांना सरकारच्या दबावाला बाली पडावं लागतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *