आताचे कल खूप बदलले नाहीत तर भाजप स्वबळावर सरकार बनवेल. या विजयासाठी मी मोदी शहांचं अभिनंदन करतो.

भारताला माझ्या शुभेच्छा! त्या अशासाठी की मोदी शहांच्या जिंकण्याने अनेक जिंकणार पण अनेक हरणार आहेत. त्याचा हिशेब मांडला तर अनेकांना शुभेच्छा देणं गरजेचं आहे.

रोहीत वेमुलाची शहादत आणि अखलाख हरले आहेत. अनुक्रमे समता आणि स्वातंत्र्य हरले आहे, उर्वरित समता आणि स्वातंत्र्याला आहे तेवढं टिकून राहण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

भांडवलशाही प्रचंड बहुमतानं जिंकत आहे. कामगारांना त्यांच्या जिवंत राहण्याच्या धडपडीसाठी शुभेच्छा.

शेतकरी आत्महत्त्या हरल्या आहेत. शेतकर्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी शुभेच्छा.

सव्वाशे लाख हेक्टर वनजमीन नष्ट आधीच नष्ट करण्यात आली आहे. जंगलं, झाडं, पशू पक्षांना त्यांच्या जगण्यासाठी शुभेच्छा.

वैदिक शिक्षण जिंकत असून भारतीय शिक्षण हारत आहे, भारतीय शिक्षणाला शुभेच्छा.

नोटाबंदीत रगडलेल्या गोरगरिबांनीही मोदी शहानाच मत दिले असेल तर त्यांना यापुढील आर्थिक आरिष्टातून वाचण्यासाठी शुभेच्छा.

साध्वी-मोदी-योगी जिंकत आहेत, धर्मनिरपेक्षतेला माझ्या शुभेच्छा.

सीबीआय पासून आरबीआय पर्यंत सगळ्यांचे स्क्रू मागच्या पाच वर्षात ढिल्ले करून ठेवणारे पुन्हा जिंकत आहेत. व्यवस्थेचे डोलारे कोसळणार आहेत म्हणून व्यवस्थेला शुभेच्छा.

संसद, सरकार आणि न्यायालयापेक्षाही स्वतःला मोठं समजणारांचा विजय होत असतांना लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांना शुभेच्छा.

सगळ्यात महत्वाचं. भारतीय राज्यघटनेला खूप खूप शुभेच्छा.

व्यक्तिशः मी एवढंच करू शकतो की तुमची साथ देऊ शकतो. ती देत राहीन. नक्कीच.

राज कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *