‘श्रीलंकेच्या धर्तीवर भारतातही बुरखाबंदी करा’, अशी मागणी करणारा संजय राऊत यांचा अग्रलेख शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाला. यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मात्र ” बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असे स्पष्ट केले आहे.

पक्षाची अधिकृत भूमिका नाही.-नीलम गोऱ्हे

श्रीलंकेतील आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर तेथील सरकारने देशात बुरखा व नकाबबंदी केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून याच मुद्द्याला धरून भारतातहि बुरखा व नकाबबंदीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या भूमिकेशी असहमती दर्शविताना म्हणाल्या कि, “शिवसेनेच्या भूमिका नेत्यांच्या बैठकीतून ठरत असतात. पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर त्यावर शिक्कामोर्तब होते. आजची सामनातील भूमिका कुठल्याही चर्चेतून वा आदेशातून आलेली नाही. त्यामुळे ते चालू घडामोडींवरचे वैयक्तिक मत असेल. पक्षाची अधिकृत भूमिका नाही.”

आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल.-असदुद्दीन ओवैसी

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला आहे. ” निवडीचा अधिकार हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. तुम्ही हिंदुत्व सर्वांवर थोपवू शकत नाही. उद्या तुम्ही आमच्या दाढीला आणि टोपीलाही आक्षेप घ्याल. कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने तसा निकाल दिला आहे. वैयक्तिक गोपनीयता हा देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे बुरखा घालण्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही. बुरखाबंदी करणे घटनाविरोधी आहे. हिंदुत्ववादी शक्तींना राज्यघटना नको आहे. शिवसेना त्यातीलच एक पोपट आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांनी कधी बुरखा घातला होता का ?… “असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

सामनामधील विधान हे कोत्या धार्मिक राजकारणातून आलंय.-फिरोझ मिठीबोरवाला

‘इंडियन मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी’ या पुरोगामी मुस्लिम संघटनेचे फिरोझ मिठीबोरवाला म्हणतात कि, “सामनामधील विधान हे कोत्या धार्मिक राजकारणातून आलंय. त्याकडे खूप गांभीर्यानं पाहणं चुकीचं आहे. जागतिक स्तरावर मुस्लिम दहशतवादी संघटनांचा जो दहशतवाद आपल्या देशाला पोखरतोय त्यावर ठोस उपाय शोधला पाहिजे. श्रीलंकेत सुरक्षिततेचा भाग म्हणून बुरखा बंदी राबविणे हे योग्यच आहे. अनेक मुस्लिम संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. आपल्याकडे मुस्लिम एजुकेशन सोसायटी या केरळ मधील शेक्षणिक संस्थेनेदेखील शाळा, महाविद्यालय परिसरात बुरखा घालण्यास मनाई केली आहे. दक्षिण भारतात वाढत चाललेली मुस्लिम दहशतवादी संघटनांच्या घुसखोरीची पार्श्वभूमी त्यामागे आहे. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हे पाऊल स्वागतार्हच आहे. ”

दहशतवादाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची हि दिशा चुकीची आहे.- रझिया पटेल

नामवंत लेखिका आणि विचारवंत रझिया पटेल यांचं म्हणणं आहे कि, “धर्ममार्तंडांकडून आणि विरोधकांकडून असे प्रयत्न याआधीही झालेले आहेत. पण त्यातून हि दोन टोकांची मतं असल्याचंच आतापर्यंत दिसून आलेलं आहे. जसा बुरखा आहे, तसाच घुंगटही आहे. त्यातून एकूणच स्त्रियांबद्दलचा दुय्यम दृष्टिकोनच दिसतो. पण फक्त बुरख्यावरून मुस्लिम समाजविरोधी राजकारण केलं जातंय. खरं तर बुरख्याचा प्रश्न हा प्रबोधनाचा, मुस्लिम मुलींच्या शिक्षणाचा, त्या समाजाच्या सुरक्षिततेचा विषय आहे. या घटनेतही दहशतवादाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची हि दिशा चुकीची आहे. दहशतवादाचं मूळ कारण शोधण्यासाठी स्वच्छ दृष्टीची गरज आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *